उपविभागीय पोलीस अधिकारी बांगर सेवानिवृत्त ; परतूर येथे सत्कार
परतूर : निवृत्तीनंतर आपण होतो ते पद विसरून सर्वसामान्य म्हणून जीवन जगल्यास उर्वरित आयुष्यही आनंदात जाते, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी केले. उपविभागीय पोलीस अधिकारी बांगर यांचा पोलीस दल व नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, जि. प. सदस्य राहुल लोणीकर, तहसीलदार रूपा चित्रक, पोलीस अधीक्षक गौर हसन, मुख्याधिकारी सुधीर गवळी, मोहन अग्रवाल यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना बांगर म्हणाले की, माझ्या कार्यकाळात मला सर्वांनी सहकार्य केले. आपले काम आपण ईमानदारीने केल्यास निश्चितच सन्मानाने निवृत्त होता येते. परतुरकरांनी मला भरभरून प्रेम दिले. मी हे कधीच विसरणार नाही, असेही त्यांनी सांगितले. उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव म्हणाले की, डीवायएसपी बांगर यांनी एक कुटुंब प्रमुखाप्रमाणे सर्वांना सांभाळत आपली जबाबदारी पार पाडली. आज सेवानिवृत्ती बद्दल जो गौरव होत आहे, हिच त्यांनी केलेल्या कार्याची पावती आहे. बांगर हे सर्वांना हवेहवेसे वाटणारे होते. कार्यकाळात त्यांनी केलेले काम उत्तम असल्याने आज ते सन्मानाने निवृत्त होत आहे. यापुढे सेवानिवृत्तीचा कार्यकाळ त्यांचा सुखाचा व आरोग्यदायी जावो, असेही जाधव यांनी सांगितले. माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, भाजपाचे राहूल लोणीकर, सेनेचे मोहन अग्रवाल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी डीवायएसपी सोपान बांगर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक विलास निकम, सपोनि रवींद्र ठाकरे, सुनील बोडखे, सपोनि सुभाष सानप, सपोनि मोरे, सपोनि गणेश लिपत्रेवार, नगरसेवक राजेश भुजबळ, विस्तार अधिकारी प्रेरणा हरबडे, रेखा लोखंडे, रहेमू कुरेशी, अखिल काजी, आण्णासाहेब लोखंडे, शेषराव पवार, गणेश शिंदे, शाम गायके यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आभार सपोनि रविंद्र ठाकरे यांनी मानले.
फोटो
परतूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी सोपान बांगर यांचा सेवानिवृत्ती बद्दल सत्कार करताना माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, राहूल लोणीकर, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, तहसीलदार रूपा चित्रक, अधीक्षक गौर हसन आदी.