लोकमत न्यूज नेटवर्क
आन्वा (लोवा) - भोकरदन तालुक्यातील वाकडी येथील सिंगल फेजचे रोहित्र जळल्याने गेल्या दोन महिन्यांपासून अर्धे गाव अंधारात आहे. यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.
वाकडी गावाची लोकसंख्या जवळपास चार हजारांच्या आसपास आहे. गावात सिंगल फेजची तीन रोहित्रं आहेत. यातील कब्रस्तान मार्गावरील रोहित्र मागील दोन महिन्यांपासून जळले आहे. त्यामुळे अर्धे गाव अंधारात आहे. वीजपुरवठा खंडित असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. रात्रीच्यावेळी फॅन, कुलर बंद असल्याने डास चावत आहेत. यामुळे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. गावातील पाणीपुरवठ्याचे नियोजनही कोलमडले आहे. रोहित्र दुरूस्त करण्याबाबत अनेकवेळा महावितरण कंपनीकडे तक्रारी करण्यात आल्या. परंतु, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने येथील रोहित्र दुरूस्त करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गावातील बंद रोहित्राची तातडीने दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.