राजूर परिसरातील बाणेगाव, चांधई ठोंबरी, चणेगाव, लोणगाव, पिंपळगाव थोटे, थिगळखेडा, तुपेवाडी, चिंचोली निपाणी, चांधई टेपली, पळसखेडा पिंपळे येथील ग्रामपंचायतींच्या चुरशीच्या निवडणुका झाल्या आहेत. बाणेगाव येथे मागील २० वर्षांपासून भाजपचे रामेश्वर पडोळ यांच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतीवर नवखे अशोक गायके यांनी एकतर्फी विजय मिळविला आहे. लोणगाव येथे मागील २० वर्षांपासून ओंकारसिंह शेखावत यांच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतीवर नवख्यांनी बाजी मारली आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख माधवराव हिवाळे यांच्या ताब्यातील ग्रामपंचायत रवींद्र शेळके यांनी हिसकावून घेतली आहे.
चांधई ठोंबरी येथे एकत्रित येऊन तरुणांनी प्रस्थापितांसमोर आव्हान उभे केले होते. यामध्ये तरुणांनी नऊपैकी आठ जागांवर यश मिळवून प्रस्थापितांचा धुव्वा उडविला आहे. राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष अण्णासाहेब भालेराव यांचे थिगळखेडा ग्रामपंचायतीवर वर्चस्व होते. या वेळेस भाजपने मुसंडी मारून भालेराव यांच्या सत्तेला सुरुंग लावला आहे. चणेगाव येथे उद्धव जायभाये यांच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतीवर स्वाभिमानीचे निवृत्ती शेवाळे यांनी एकतर्फी आठ जागा जिंकून जायभाये यांच्या गटाला चारीमुंड्या चीत केले आहे.
चौकट
चांधई टेपलीत सत्तांतर झाले असून, भगवान टेपले यांच्या गटाने बाजी मारली आहे. तुपेवाडी ग्रामपंचायतवर एकनाथ मोरे यांनी एकतर्फी बाजी मारून सत्ताधाऱ्यांना वंचित ठेवले आहे. चांधई एक्को व उंबरखेडा ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध निघालेल्या आहेत. राजूर परिसरातील सर्वच ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत जनतेने सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कौल दिल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.