जालना : गिरमीटने होल पाडून दरवाजाचा कडीकोयंडा उघडून जिल्हाभरात अनेक ठिकाणी घरफोडी करणाऱ्या टोळीतील एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी जेरबंद केले. उत्तम भीमा गायकवाड (रा. पारधीवाडा, ता. परतूर) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा ३ लाख ३३ हजार ४५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
परतूर तालुक्यातील खांडवी येथील सूर्यकांत बरकुले यांच्या राहत्या घरी २८ डिसेंबर रोजी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, खांडवी येथील घरफोडी उत्तम गायकवाड याने साथीदारांसोबत केलेली आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. या माहितीवरून त्याला परतूर येथून ताब्यात घेतले. गुन्ह्यांबाबत विचारपूस केली असता, त्याने खांडवी व केंधळी येथे साथीदारांच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली. तसेच राणीवाहेगाव येथून दुचाकी लंपास केल्याचेही सांगितले. त्याच्याकडून ३ लाख २३ हजार ४५५ रुपयांचे दागिने व १० हजार रुपये किमतीची दुचाकी असा ३ लाख ३३ हजार ४५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, पो.हे.कॉ. किशोर एडके, सॅम्युअल कांबळे, प्रशांत देशमुख, पोलीस नाईक कृष्णा तंगे, सागर बाविस्कर, जगदीश बावणे, सचिन चौधरी, किशोर पुंगळे, विलास चेके, देवीदास भोजणे, रवी जाधव, मंदा बनसोडे आदींनी केली.
पोलीस इतर साथीदारांच्या मागावर
उत्तम गायकवाड याने आपल्या साथीदारांसोबत अनेक ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत. याचा तपास पोलीस करीत असून, इतर साथीदारांच्या मागावर पोलीस आहेत. सदरील टोळी गिरमीटच्या साहाय्याने दरवाजाला होल पाडून कडीकोयंडा उघडायचे. दरम्यान, उत्तम गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.