मंठा : मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन
मंठा : मागील थकीत देयके अदा करावे, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्रातील जिनिंग प्रेसिंग संघटनेच्या वतीने ११ व १२ जानेवारी रोजी राज्यातील जिनिंग प्रेसिंग उद्योग दोन दिवस (कापूस खरेदी) बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन महाराष्ट्र जिनिंग प्रेसिंग संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमहाप्रबंधक औरंगाबाद आणि व्यवस्थापकीय संचालक मुंबई यांना पाठविण्यात आले आहे.
मागील २०२०- २१ या वर्षात कापूस खरेदीच्या हंगामात सीसीआयकडून सुरळीत कापूस खरेदी सुरू असताना मार्च २०२० मध्ये कोविड- १९ च्या महामारीने राज्यात हाहाकार केला. दरम्यान शासनाला संचारबंदी करावी लागली. त्यामुळे जिनिंग प्रेसिंगवर काम करणाऱ्या मजुरांचे काम बंद झाल्याने स्थलांतर झाले. पर्यायाने सुरळीत सुरू असलेली कापूस खरेदी बंद झाली. परंतु, शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेला कापूस खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र शासन, जिल्हा प्रशासन आणि बाजार समित्यांनी जिनिंग प्रेसिंग मालकांवर दबाव आणून जिनिंग सुरू करण्यास भाग पाडले. राज्य जिनिंग प्रेसिंग संघटनेने देखील शासनाला आणि शेतकऱ्यांना सहकार्य केले. मजूर नसतांना कोविड काळात जीव धोक्यात घालून मे २०२० मध्ये पुन्हा कापूस खरेदीला सुरूवात केली. पुढे बिगर मौसमी- मौसमी अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, चक्रीवादळ असताना देखील कापूस, कापसाच्या गाठी, सरकी ताडपत्र्यांनी झाकून मालाचे संरक्षण केले. परंतु, कोरोना महामारीत बंद असलेले ट्रान्सपोर्ट व इतर कारणांमुळे उत्पादित गाठी आणि सरकी फेडरेशनकडून विहित मुदतीत न उचलल्यामुळे वातावरणातील आर्द्रतेमुळे कापूस गाठी व सरकीची प्रतवारी खराब झाली. यात जिनिंग प्रेसिंग मालकांचा कोणताही दोष नसतांना फेडरेशनने महाराष्ट्रातील अनेक जिनिंग प्रेसिंग धारकांना नुकसान भरपाईच्या नोटिसा बजावल्या. नुकसान भरपाईची मागणी केली आहे. ज्या जिनिंगवर नुकसान झालेले नाही, त्या जिनिंग मालकांचे सुद्धा मागील थकीत देयके दिलेले नाहीत, तर ज्यांना नुकसान भरपाईच्या नोटीस दिल्या आहेत, त्यांना सन २०२०-२१ हंगामासाठी (अद्याप) पर्यंत करारबद्ध केलेले नाही.
चौकट
वेळीच मागील देयके १० जानेवारी पर्यंत देऊन चालू हंगामासाठी करार करण्यात यावा, अन्यथा ११ व १२ जानेवारी रोजी दोन दिवस महाराष्ट्रातील जिनिंग प्रेसिंग संघटनेने जिनिंग बंदचा निर्णय घेतला आहे. मागण्या मान्य न झाल्यास २५ जानेवारीपासून बेमुदत जिनिंग प्रेसिंग बंद ठेवले जाईल, असा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष भूपेंद्रसिंह राजपाल, उपाध्यक्ष ओमप्रकाश डागा, सचिव रणजित चावला, विजय बियाणी, पेहरे, राठी, अजय सोमाणी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
कोट
मागील हंगामात कोविड- १९ मुळे जिनिंग प्रेसिंग उद्योजकांनी शेतकऱ्यांना आणि शासनाला सहकार्य करून अतिवृष्टी, वादळ अशा परिस्थितीत कापूस खरेदी केली. यावेळेत दरवर्षी मशिनरीची दुरूस्तीची कामे असतात. परंतु, ती न झाल्यामुळे मशिनरीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच फेडरेशनकडून या उद्योजकांना नुकसान भरपाईच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. मागील देयके बाकी असून सुद्धा काही जिनिंग उद्योजकांसोबत पुढील करार केले आहेत, त्यामुळे जिनिंग उद्योग अडचणीत आले आहेत.
-संजय छल्लानी, संचालक, महावीर जिनिंग, मंठा.