टेंभुर्णी : मुलींचा जन्मदर वाढावा, यासाठी शासनस्तरावरून विविध उपक्रम राबिवले जातात. याचाच एक भाग म्हणून आणि मुलींच्या लग्नात होणाऱ्या खर्चात बचत व्हावी, यासाठी खानापूर (ता. जाफराबाद) येथील सरपंच शोभा दिनकर शेळके यांनी मुलीच्या लग्नासाठी मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ मंगळवारी गावातील कन्या अर्चना पुंजाराम शेळके हिच्या लग्नसमारंभात मोफत पाणी देवून केला. यावेळी गजानन शेळके, दिनकर शेळके, शिवहरी शेळके यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
दरम्यान, घरी कोणतेही कार्य असो त्यासाठी पाणी अत्यावश्यक गरज आहे. विशेषतः अनेक लग्नसमारंभ उन्हाळ्यात होत असल्याने त्यावेळी वधुपित्याला पाण्याची व्यवस्था करताना मोठ्या खास्ता खाव्या लागतात. यामुळे गावातील लेकीबाळीच्या लग्नात लागेल तेवढे मोफत पाणी पुरविण्याचा निर्णय आपण घेतला असल्याचे सरपंच शोभा शेळके यांनी सांगितले.