केदारखेडा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सात पैकी पाच उपकेंद्रात समुदाय विकास अधिकारी म्हणून डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. या डॉक्टरांच्या नियुक्तीमुळे या भागातील रूग्णांसह नातेवाईकांची होणारी गैरसोय आता थांबणार आहे.
केदारखेडा आरोग्य केंद्रांतर्गत सात उपकेंद्रे व २७ गावांचा समावेश आहे. या गावातील रुग्णांना उपचारासाठी केदारखेडा येथे यावे लागत होते. उपकेंद्रस्तरावर आवश्यक सुविधा नसल्याने आरोग्य केंद्रात उपचार घ्यावे लागत होते. त्यामुळे २७ गावांचा भार एका वैद्यकीय अधिकाऱ्यांवर येत होता. केदारखेडा आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदस्थापना असताना गेल्या काही वर्षांपासून एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. परंतु, आता शासनाने आयुष्यमान भारत योजनेंतर्गत केदारखेडा आरोग्य केंद्रांतर्गत येणाºया सातपैकी पाच उपकेंद्रांवर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (एनआरएचएम) मार्फत समुदाय विकास अधिकारी पदांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या पदांच्या भरतीमुळे ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. अनेक असंसर्गजन्य आजाराचे निदान व उपचार उपकेंद्रस्तरावर मिळणार आहेत. या पाचही नवनियुक्त डॉक्टरांचे केदारखेडा आरोग्य केंद्रात केदारखेडा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधाकर लटपटे यांनी स्वागत केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. जी. लटपटे, औषध निर्माण अधिकारी डी. बी. गाढवे, आरोग्य पर्यवेक्षक बी. एस. बेडवाल, आरोग्य सहायिका एस. डी. पवार, आरोग्य सहायक एस. एम. वाघ, गटप्रवर्तक व्ही. बी. तांबे, एस. एस. नरवडे, आरोग्य सेविका के. एस. गावित, पी. सी. खडेकर, भाग्यश्री तळेकर, एस. जे. दांडगे, ए. आर. काळे, वाय. डी. गायकवाड, आर. एस. जाधव, के. बी. तोटे, ए. एस. शेजुळ, के. एम. बोचरे, एस. बी. सहाने, एम. के. हिरेकर, के. बी. दांडगे, ए. जी. काद्री, के. के. डोभाळ, के. डी. ठोंबरे, कनिष्ठ सहाय्यक पी. के. सोनवने, परिचर ए. जे. शेजुळ, सोनवणे, रुग्णवाहिका चालक आर. बी. राठोड आदींची उपस्थिती होती.
या उपकेंद्रांमध्ये नियुक्ती
केदारखेडा आरोग्य केंद्रांतर्गत नळणी खुर्द येथे डॉ. संभाजी गायकवाड, बरंजळा लोंखडे येथे डॉ. सदाशिव डवरे, सोयगाव देवी येथे डॉ. हर्षाली काळे, नांजा येथे डॉ. वैभव नेव्हार, फत्तेपूर येथे डॉ. प्राजक्ता भिसडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.