जालना : पाहेगाव येथील रमेश शेळके (५५) यांचा खून पैशांच्या देवाणघेवाणीवरून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अर्जुन बाबासाहेब दांडाईत, अभिमन्यू अर्जुन दांडाईत (दोघे रा. ब्राम्हणखेडा, ता. जि. जालना) या दोन संशयित आरोपींना बुधवारी ताब्यात घेतले आहे.
पाहेगाव येथील रमेश शेळके यांचा खून करून कारसह मृतदेह जाळून दरीत ढकलल्याची घटना जालना तालुक्यातील सेवली-पाहेगाव रस्त्यावरील नागापूर शिवारात सोमवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी मृताचा मुलगा अक्षय शेळके यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी रामप्रसाद शेळके, एक महिला व सचिन शेळके, संदीप शेळके, विशाल काळे (रा. बाबुलतारा) व अर्जुन दांडाईत (रा. ब्राम्हणखेडा) यांच्याविरुद्ध सेवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तपासात या गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा ब्राम्हणखेडा येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांना मिळाली. या माहितीवरून त्या ठिकाणी पथक पाठवून संशयित आरोपी अर्जुन दांडाईत याला ताब्यात घेतले.
खून केल्याची कबुलीसंशयित आरोपी अर्जुन दांडाईत याची पोलिसांनी चौकशी केली. साथीदारासह रमेश शेळके यांना दारू पाजली. दोरीने गळा आवळून डोक्यावर दगड-विटाने मारून त्यांचा खून केला. त्यानंतर पाथ्रुड घाटातील दरीजवळ कारसह मृतदेह जाळून दरीत ढकलले. त्यानंतर मुलगा अभिमन्यू दांडाईत याला बोलवून घेतले. त्याने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, अशी कबुली अर्जुन दांडाईत याने दिली. पोलीस इतर दोन साथीदारांच्या मागावर आहेत. दरम्यान, अर्जुन दांडाईत याचे रमेश शेळके यांच्याकडे पैसे होते. ते पैसे देत नसल्यामुळेच खून केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, पोलीस निरीक्षक प्रशांत देशमुख, भाऊराव गायके, मदनसिंग बहुरे, जगदीश बाबणे, सागर बाविस्कर, किशोर पुंगळे, संदीप मांटे, रमेश पैठणे, महिला अंमलदार आशा जायभाये आदींनी केली.
खुनात भावाचा हात असण्याची शक्यतामृताचा मोठा भाऊ रामप्रसाद शेळके व रमेश शेळके यांच्यात जमिनीचा वाद होता. या वादातूनच रामप्रसाद शेळके यांनी अर्जुन दांडाईत याला खुनाची सुपारी दिली असल्याचा संशय आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांनी दिली. त्या बाजूनेही पोलीस तपास करीत आहेत.