आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामपंचायतला पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने गटविकास अधिकारी उदयसिंग राजपूत, तालुका वैद्यकीय अधिकारी आर.एम. चंदेल यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवकांना यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यामध्ये अनेक ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे पुरस्कार जाहीर केले असून, भोकरदन तालुक्यातील आडगाव भोंबे या ग्रामपंचायतीचा प्रथम क्रमांक आला आहे, तर नळणी (बु.) ग्रामपंचायतीचा द्वितीय व खामखेडा ग्रामपंचातयीचा तृतीय क्रमांक आला आहे. या सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंचांचा पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते गौरव केला जाणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी उदयसिंग राजपूत, तालुका वैद्यकीय अधिकारी आर.एम. चंदेल यांनी दिली.
कोट
कोरोनामुळे गत दोन वर्षांपासून राज्य, देशाची आर्थिक स्थिती कोलमडली असून, त्याचा परिणाम ग्रामीण जनजीवनावरही झाला आहे. शहरातील अनेक युवक नोकरी सोडून, तर काही जण नोकरी गेल्याने परत आले. अशाही स्थितीत आम्ही गावात कोरोनाचा शिरकाव होऊ दिला नाही. सर्व सदस्य, पदाधिकारी, ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नातून आजवर कोरोनाला दूर ठेवण्यात आम्हाला यश आले आहे.
-कौशल्याबाई भोंबे, सरपंच आगडगाव भोंबे