पारध - भोकरदन तालुक्यातील महत्त्वाचा समजला जाणाऱ्या पारध ते वालसावंगी या सात किमी रस्त्याचे काम निष्कृट दर्जाचे होत असल्याने ग्रामस्थांनी काम बंद पाडले होते. त्यानंतर संबंधित विभागाने चौकशी करून रस्त्याचे काम सुरू करणे अपेक्षित होते. परंतु, १५ दिवसानंतरही रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नव्हती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन संबंधित विभागाने बुधवारपासून रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे.
पारध ते वालसावंगी या रस्त्याची दुरवस्था झाली होती. या रस्त्यावरून वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागत असल्याने अपघाताचाही धोका वाढला होता. केवळ सात किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्यासाठी अर्ध्या तासाहून अधिक वेळ लागत होता. शिवाय वाहनांचे होणारे नुकसान आणि चालक, प्रवाशांना जडणारे हाडांचे आजार वेगळेच आहेत. वाढलेले अपघात पाहता या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी, अशी मागणी लावून धरली होती. ग्रामस्थांच्या रेट्यानंतर बांधकाम विभागाने या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली होती. परंतु, होणारे काम हे निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यानंतर ग्रामस्थांनी ते काम बंद पाडले. जोपर्यंत दर्जेदार काम होणार नाही, तोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होऊ देणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. त्यानंतर संबंधित विभागाने तातडीने काम सुरू करण्याची गरज होती. परंतु १२ दिवस उलटूनही काम सुरू न झाल्याने ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल भोकरदन येथील सा. बां. विभागाचे सहायक अभियंता कोल्हे आणि कंत्राटदार सुधाकर दानवे यांनी घेऊन तात्काळ कामास भेट देऊन कामाची पाहणी केली. हे काम दर्जेदार करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. त्यानुसार बुधवारपासून या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
कोट
पारध ते वालसावंगी रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील विकासाला नक्कीच चालना मिळेल. या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला त्याबद्दल ‘लोकमत’चे विशेष आभार.
प्रा. संग्राम देशमुख, जिल्हा सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
===Photopath===
240221\24jan_17_24022021_15.jpg
===Caption===
पारध -वालसावंगी रस्त्याचे काम करतांना मंजूर दिसत आहे.