लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील गांधी चमन येथील महिला रूग्णालय परिसरात झालेल्या अतिक्रमणाबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेत नगरपालिकेने बुधवारी पोलीस बंदोबस्तात येथील अतिक्रमण हटवले.
शहरातील गांधी चमन भागात महिला रूग्णालय असून, कोरोनामुळे जिल्हा रूग्णालयातील बाह्यरूग्ण विभागही याच इमारतीत स्थलांतरित करण्यात आला आहे. या रूग्णालयासमोरच राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा असून, रूग्णालयाच्या प्रवेशद्वारासह बाह्यद्वारावरही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. त्यामुळे रूग्ण घेऊन येणाऱ्या रूग्णवाहिकेसह वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची वाहनेही रूग्णालयात नेताना कसरत करावी लागत होती. अतिक्रमणधारकांमुळे रूग्णालय परिसरात अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. याबाबत ‘लोकमत’ने ‘महिला रूग्णालय इमारत अतिक्रमणाच्या विळख्यात’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेत नगरपालिका प्रशासनाने बुधवारी पोलीस बंदोबस्तात या परिसरातील अतिक्रमण हटवले. यावेळी पालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण हटवत परिसर मोकळा केला.
कारवाईत सातत्य गरजेचे
नगरपालिकेकडून वेळोवेळी कारवाई केली जाते. परंतु, पुन्हा अतिक्रमण होत आहे. या अतिक्रमणांचा त्रास पादचारी, वाहनचालकांनाही होत आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने अतिक्रमण करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई करण्याची गरज आहे.