पारध : सध्या कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. मागील वर्षी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सर्वसामान्यांची झालेली परवड पाहता या वेळी काहींना कोरोनाची तर हातावर पोट असणाऱ्यांना लॉकडाऊनची भीती असल्याचे चित्र भोकरदन तालुक्यातील पारध परिसरातून पाहायला मिळत आहे.
मागील वर्षी कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर सरकारने लॉकडाऊन केले होते. लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केल्याने रुग्णसंख्या घटली खरी; पण हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब जनतेचे मोठे हाल झाले. शासनाने लॉकडाऊन जाहीर केले, परंतु गरिबांना कुठल्याही प्रकारे मदतीचा हात दिला नाही. काही सेवाभावी संस्था, दानशूर, पुढाऱ्यांनी सुरुवातीला लोकांना अल्पशी मदत केली. परंतु, त्यानंतर मदत न मिळाल्याने जनतेचे प्रचंड हाल झाले.
मध्यंतरी कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर आता कुठे व्यवहार सुरळीत चालू झाले होते. तोच पुन्हा फेब्रुवारीपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पारध परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी काही निर्बंध लादले आहेत. मास्क, सॅनिटायझरसह सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचे आवाहन केले आहे. परंतु, नागरिक याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता पारध येथे रविवार, सोमवार आणि मंगळवारी जनता कर्फ्यू लावण्यात आला होता. या जनता कर्फ्यूला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीमात्र नागरिक रस्त्याने फिरताना दिसून आले. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासन लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांनी याची धास्ती घेतली आहे. लॉकडाऊन करा; मात्र, त्याआधी गोरगरीब व हातावर पोट असणाऱ्यांची पोटापाण्याची व्यवस्था करा, अशी मागणी होत आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून कोरोना संदर्भातील त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करावे. कोरोनापासून स्वतःचे संरक्षण करावे. पोलिसांना कठोर कार्यवाही करण्यास भाग पाडू नये.
- अभिजित मोरे, सपोनि, पोलीस ठाणे, पारध