घनसावंगी तालुक्यातील आंतरवाली दाई येथील शेतकरी पद्माकर काळे यांचा मुलगा विकास काळे यांने सीएची अंतिम वर्षाची परीक्षा यशस्वीरित्या पास केली आहे. यामुळे संपूर्ण गावामध्ये अगदीच आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण झाले आहे. एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने मिळवलेले हे यश निश्चितच प्रेरणादायी आहे. गावामध्ये शैक्षणिक वातावरणाचा वानवा असलेले हे आंतरवाली दाई गाव. उच्च शिक्षण म्हणजे काय? असा प्रश्न गावातल्या विद्यार्थ्यांना असायचा याच परिस्थितीतून विकास ने सीए करण्याचा मार्ग निवडला आणि आदर्श घडवला.
अंतरवाली दाई येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये चौथीपर्यंत विकासने शिक्षण घेतले. त्यापुढील शिक्षण पानेवाडी येथील महात्मा फुले विद्यालय येथे मराठी माध्यमातून घेतले. दहावी पास झाल्यानंतर शेती करावी की पुढे शिक्षण करावे या संभ्रमावस्थेत असलेल्या विकासला त्याच्या भावाने औरंगाबाद शहरातील एका महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला.
हे शिक्षण पूर्ण करण्यासाठी देखील विकासची आर्थिक परिस्थिती नव्हती. विकासची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे मेस लावायला सुद्धा त्याच्याकडे पैसे नव्हते तेव्हा तो रूमवर हाताने स्वयंपाक बनवायचा आणि अभ्यास करायचा. हे शिक्षण पूर्ण होईल की नाही इतकी अनिश्चितता होती पण त्याच्या दोन्ही भावांनी खासगी नोकरी करून आणि घर सांभाळून विकासला शिक्षणामध्ये मदत केली आणि त्यामुळेच तो हे शिक्षण पूर्ण करू शकला अशी भावना विकासने यावेळी व्यक्त केली.
त्याने त्याचे सीएचे शिक्षण द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया येथे पूर्ण केले. त्याने त्याची आर्टिकलशिप सीए एस. बी.देशमुख यांच्याकडे पूर्ण केली. विकासने नोव्हेंबर २०२० मध्ये सीएच्या अंतिम वर्षाची परीक्षा दिली आणि या परीक्षेत त्याने अत्यंत घवघवीत असे यश मिळवले.
प्रचंड मेहनतीने, त्यागाने आणि तपस्येने, त्याने हे यश मिळवले आहे. त्याचे हे यश हेच दाखवून देते की ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील शिकलेला एक मुलगा अत्यंत उच्च पदावर जाऊ शकतो आणि कुठल्याही प्रकारच्या सुखसुविधा नसताना देखील यश मिळवले जाऊ शकते. ग्रामीण भागामध्ये सुविधांची असलेली वानवा याच्यावर मात करून जे मिळतंय त्यात समाधान मानून आपल्याला हे यश मिळवायचे आहे हेच विकासने त्याच्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे.
विकासने त्याच्या आईबद्दल एक आठवण सांगताना एक किस्सा सांगितला की विकासच्या आई उषाताई काळे या पॅरालिसिस या आजारामुळे घरीच असतात. जेव्हा विकासच्या आईला पॅरालिसिसचा अटॅक आला होता तेव्हा विकासचे सीएचे पेपर चालू होते आणि या कठीण काळात देखील विकासने त्याचे पेपर दिले आणि यश मिळविले होते.
विकास काळे यांचे वडील पद्माकरराव काळे आणि आई उषा काळे दोघेही शेतकरी आहेत. विकासला या खडतर प्रवासामध्ये त्याचे बंधू श्री लक्ष्मण काळे आणि प्रीती लक्ष्मण काळे तसेच दुसरे बंधू श्री सतीश काळे, निकिता सतीश काळे यांनी अगदीच मोलाची साथ दिली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मदत करायचे स्वप्न विकासचे आहे.
विकास काळे यांना या यशासाठी सीए सचिन देशमुख, सीए लक्ष्मीकांत शेटे, सीए सतीश मोहारे, सीए कुणाल टरघळे, सीएस आनंद फलके,विष्णू मिसाळ यांनी मार्गदर्शन केले.