जालना : जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढविणे, होणारे बालविवाह थांबविण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर टास्कफोर्सची स्थापना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी झालेल्या बेटी बचाव बेटी पढाओ या योजनेच्या पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. २२ जानेवारी २०१५ रोजी बेटी बचाव बेटी पढाओ या योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथे होणार आहे. या योजनेमध्ये जालना जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असून जिल्ह्यातील ० ते ६ वयोगटातील मुलींचे लिंग गुणोत्तर, मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणातील गळतीचे प्रमाण घटवून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, बालविवाह थांबविणे, मुलींना आरोग्य व स्वच्छता या बाबींची माहिती समजावून देणे आदी बाबी या योजनेअंतर्गत करावयाच्या असून अधिकाऱ्यांनी ही योजना १०० टक्के यशस्वी करण्यासाठी जबाबदारीने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नायक यांनी केले.ग्रामीण पातळीपर्यंत या योजनेच्या जनजागृतीसाठी होर्डिंग, प्लेक्स तसेच जिल्हा व तालुकास्तरावर कार्यशाळा आयोजित करण्यात याव्यात, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. यावेळी पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत जिल्ह्यात झालेल्या कामाचा आढावाही जिल्हाधिकारी नायक यांनी घेतला. या बैठकीस जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, जिल्हा शल्य चिकित्सक पाटील, शिक्षणाधिकारी अशोक राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा पवार, सर्व शिक्षा अभियानच्या जिल्हा समन्वयक नूतन मघाडे, विरेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)या राष्ट्रीय कार्यक्रमात ज्या सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांना सहभाग नोंदवावयाचा असेल त्यांनी महिला व बालकल्याणच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा पवार किंवा सर्वशिक्षा अभियानच्या जिल्हा समन्वयक नूतन मघाडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नायक यांनी केले.
टास्कफोर्सची स्थापना
By admin | Updated: January 1, 2015 00:25 IST