२३ गावांत सुपिकता निर्देशांक फलक
भोकरदन : तालुक्यातील धावडा परिसरातील २३ ग्रामपंचायतींनी जमीन सुपिकता निर्देशांक फलक लावले आहेत. शेतकऱ्यांना जमीन सुपिकेतची माहिती मिळावी, पिकांची पेरणी, बियाणांची निवड आदींची माहिती व्हावी, यासाठी हा उपक्रम राबविल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
अनेकांकडून कोरोना सूचनांचे उल्लंघन
बदनापूर : शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता प्रशासकीय सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मात्र, बाजारपेठेत फिरणारे अनेक नागरिक कोरोनातील सूचनांचे उल्लंघन करीत आहेत. त्यामुळे प्रशासनाने कारवाई मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
सर्दी, खोकल्याच्या रुग्णसंख्येत वाढ
जालना : बदलत्या वातावरणामुळे शहरासह ग्रामीण भागात सर्दी, खाेकल्याच्या रु संख्येत मोठी वाढ होत आहे. हे आजार कोरोनाची लक्षणे असल्याने अनेकजण खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेत असून, मास्कसह सॅनिटायझरला मागणी वाढल्याचेही बाजारात दिसून येत आहे.
बंद पडलेले पथदिवे सुरू करण्याची मागणी
मंठा : शहरांतर्गत भागातील काही पथदिवे बंद पडले आहेत. त्यामुळे रात्रीच्यावेळी पादचारी नागरिकांची गैरसोय होत आहे. शिवाय चोरटे अंधाराचा फायदा घेऊन चोऱ्या करीत आहेत. ही बाब पाहता, नगरपालिकेच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी बंद पडलेले पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.