जालना : मराठा आरक्षण आंदोलन हे कोणत्याही व्यक्ती किंवा राजकीय पक्षांनी पुरस्कृत केलेले नसून समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, ही सर्वांची भावना आहे. यात विविध विचारधारा असलेले मराठा बांधव आरक्षणासाठी एकत्र आलेले आहेत. परंतु, काही व्यक्ती चुकीचे वर्तन करून हे आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे षड्यंत्र समाज खपवून घेणार नाही, असा इशारा मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख यांनी दिला.
अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनस्थळी शनिवारी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक व समाजबांधवांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अरविंद देशमुख यांनी भूमिका मांडली. यावेळी उपोषणकर्ते मनोज जरांगे, अशोक पडूळ, छावाचे संतोष जेधे, सुभाष चव्हाण, मंगेश मोरे, ॲड. शैलेश देशमुख, संतोष कऱ्हाळे आदींची उपस्थिती होती. शासनपुरस्कृत व्यक्ती सुरू असलेले आंदोलन कोणाच्या तरी प्रेरणेने सुरू आहे, अशी बोंब मारून हे आंदोलन बदनाम करून भरकटवण्याचा व दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातून समाजात गैरसमज पसरवला जातोय. या प्रकाराचा मराठा क्रांती मोर्चा निषेध करीत असून मूळ प्रश्न व समस्या शासनाने सोडविल्या तर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, असेही देशमुख यांनी ठणकावून सांगितले.
यावेळी साष्टपिंपळगाव येथील महिला, नागरिकांची उपस्थिती होती.
(फोटो)