पाथरी - अतिवृष्टीमुळे जालना जिल्ह्याच्या बंधाऱ्यातून गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आलेल्या पाण्याने गोदावरी नदीला मोठा पूर आला असून गोदावरी नदीचे पात्र तुडुंब भरून वाहू लागले आहे. ढालेगाव बंधाऱ्याचे 16 पैकी 15 गेटमधून दुपारी 1 लाख 32 हजार 368 कूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. वरच्या बंधाऱ्यातून मात्र 1 50 हजार 368 कूसेस पाण्याची अवाक सुरू आहे. दरम्यान, ढालेगाव बंधाऱ्याचे गेट नंबर 8 मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सायंकाळी 5 पर्यंत पाण्याचा विसर्ग सुरू नव्हता.
मुसळधार आणि अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने 4 सप्टेंबर पासून दिला होता. यानुसार, कालपासून मोठया पावसाला सुरुवात झाली. 5 सप्टेंबर रोजी सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत असल्यामुळे गोदावरी नदीच्या पात्रातील तिन्ही बांधरे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. दरम्यान, जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील लोणी सावंगी बंधाऱ्यातून सकाळपासून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आला. तर, दुपारी लोणी बंधाऱ्यातून गोदावरी नदीच्या पात्रात 1 लाख 50 हजार 348 कूसेस पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पाथरी तालुक्यातील तिन्ही बंधाऱ्याचे सर्व गेट उघडण्यात आले आहेत.