जालना : शहरासह परिसरातील बीएसएनएलसह खाजगी मोबाईल कंपन्यांची सेवा विस्कळीत झाली आहे. एकमेकांना संपर्क साधण्यासह इंटरनेट सेवेचाही बोजवारा उडाला आहे. परिणामी शासकीय, निमशासकीय कामकाजावर याचा मोठा परिणाम झाला आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देवून सुरळीत सेवा पुरवावी, अशी मागणी शहरातील मोबाईलधारकांमधून केली जात आहे.
मोकाट जनावरांच्या बंदोबस्ताची मागणी
बदनापूर : शहरातील मुख्य बाजारपेठेसह अंतर्गत रस्त्यांवर मोकाट जनावरे, कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे चालकांना कसरत करीत वाहने चालवावी, लागत असून, अपघाताचाही धोका वाढला आहे. शिवाय महिला, बालकांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी नगर पंचायतीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देवून जनावरांचा बंदेाबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
शेतकऱ्यांनी घेतला कृषी योजनेचा लाभ
पारडगाव : घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथील अनेक शेतकऱ्यांनी थकीत वीजबिल भरून शासकीय योजनेचा लाभ घेतला. सहायक अभियंता मुकुंद लिमजे यांनी गावाला भेट देवून जागृती केली. त्यानंतर शेतकऱ्यांनी आपली थकीत बिले भरली. यावेळी शेतकरी चंद्रभूषण जयस्वाल, गुलाब आढाव, श्रीमंत ढेरे, विष्णू वडे, विष्णू डोळझाके, विलास आढाव, बाबासाहेब आढाव, विष्णू खरात, सय्यद शफी अहमद, रामेश्वर ढेरे, विष्णू खरात, बाबुराव कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.