जालना : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची अँटिजन तपासणी करावी, अशी मागणी प्रहार लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांना देण्यात आले.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. शिवाय, नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे. असे असतानाही शासकीय कार्यालयात येणारे नागरिक नियमांचे पालन करीत नाहीत. त्यामुळे कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारत येत नाही. यासाठी आरोग्य विभागाने जिल्हा परिषदेत येणाऱ्या नागरिकांची अँटिजन तपासणी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. या निवेदनावर एस. दांडगे, आर. बी. गोलांडे, डी. एस. साबळे, इमरान खान, आटोळे, पंजाब खिल्लारे, ए. एम. वाघमारे, एस. ए. पंजाबी, एम. एम. कुरेशी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.