अध्यक्षपदी बनकर तर सचिवपदी हेरकर
जालना : गटविमा गृहनिर्माण संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रताप बनकर यांची तर सचिवपदी संजय हेरकर यांची निवड करण्यात आली आहे. राज्याध्यक्ष फकीरा वाघ यांच्या अध्यक्षेखाली आयोजित बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी उपाध्यक्षपदी प्रवीण कामतीकर, कार्याध्यक्षपदी आसाराम हुसे, सुनील महिश्वरी आदींची निवड करण्यात आली.
अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी
मंठा : शहरासह ग्रामीण भागात अवैध दारू विक्री, मटका, जुगार आदी अवैध धंदे जोमात सुरू आहेत. तळीरामांमुळे भांडण- तंट्यात वाढ होत असून, युवा पिढी व्यसनाधीन होत आहे. व्यसनांमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे संबंधितांनी लक्ष देऊन अवैध धंद्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
बाजारपेठेमधील कापसाचे दर वधारले
जालना : जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या बाजारपेेठेतील कापसाचे दर वधारले आहेत. पूर्वी कापसाचे दर ५ हजार रुपये क्विंटलपर्यंत खाली आले होते. सध्या पाच हजार ८०० ते ६ हजार रुपयांपर्यंत कापसाला दर मिळत असल्याचे दिसत आहे. बहुसंख्य शेतकऱ्यांनी कापूस विकल्याने या दरवाढीचा मात्र मोजक्याच शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
विस्कळीत सेवेमुळे मोबाइलधारक त्रस्त
जालना : शहरासह ग्रामीण भागातील बीएसएनएलची सेवा पूर्णत: विस्कळीत झाली आहे. विस्कळीत सेवेमुळे ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. इंटरनेटअभावी शासकीय, निमशासकीय कामावर परिणाम होत असून, सुरळीत सेवा पुरवावी, अशी मागणी होत आहे.