गावातील भास्कर हरबक यांच्या वारकरी शिक्षण संस्थान येथे दोन वर्षांपूर्वी श्रीगुरू दत्तात्रेय मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली असून, दरवर्षी येथे श्रीदत्त जयंती सोहळा साजरा केला जातो. यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांसह पं. डॉ. पराग चौधरी यांची गायन सेवा संपन्न झाली. अत्यंत मधुर व भावपूर्ण गायकीने डॉ. चौधरी यांनी भाविकांना भक्तीने रंगवले. विदुषी मीनाक्षी पराग चौधरी यांचेही भक्तिरसपूर्ण गायन झाले. ‘दिगंबरा दिगंबरा... श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या नामाने अभंगवाणीची सुरुवात झाली.
‘घ्या दत्त दत्त नाम, पद्मनाभा नारायणा’ ही गाणी चौधरी यांनी अत्यंत तन्मयतेने सादर केली. नामजप, ‘नाम तुझे बरवे गा शंकरा’, आणि भैरवी ‘बोला येळकोट’चे डॉ. चौधरी यांचे अत्यंत भावपूर्ण स्वर आसमंत भक्तिमय करून गेले. पार्थ चौधरी यांनी तबला साथसंगत केली. श. शंकर विधाते यांनी हार्मोनियम, गणेश भुतेकर यांनी पखवाज तर सागर जोशी यांनी साथसंगत केली. वैष्णवी चौधरी व श्रावणी मुधळवाडकर यांनी स्वरसाथ केली. या प्रसंगी संगीत अभ्यासक भगवान विधाते, योगेश हरबक, भागवतकार गजानन गोंदीकर, भास्करबुवा हरबक आदींची उपस्थिती होती.