अंबड : तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी मतदान केंद्राध्यक्ष, अधिकारी यांच्यासह कर्मचाऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाला ४८ जणांनी दांडी मारली तर ९७८ जणांनी दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण घेतले.
शहरातील पंडित गोविंदराव जळगावकर नाट्यगृहात आयोजित प्रशिक्षणावेळी तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी मार्गदर्शन केले. या मतदान प्रशिक्षणात पाच मतदान केंद्राध्यक्ष, १२ मतदान केंद्राधिकारी एक, १२ मतदान केंद्राधिकारी दोन, १९ मतदान केंद्राधिकारी तीन अशा एकूण ४८ जणांनी पाठ फिरविली. तर ९७८ जणांनी हे प्रशिक्षण घेतले. यावेळी नायब तहसीलदार बाबुराव चंडोल, अंजली कुलकर्णी, अनिता मोरे आदींनी विविध विषयांवर माहिती दिली. दरम्यान, १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी मतदान यंत्रणा हाताळणीसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. सर्व केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी एक, मतदान अधिकारी दोन व मतदान अधिकारी तीन यांचे प्रशिक्षण दोन सत्रात झाले.