माध्यमिक शाळा सुरू करण्यासंदर्भात निवेदन
जालना : राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्यासाठी वेगवेगळे परिपत्रक काढले आहे. यात अनेक शाळांमध्ये विना टीसीचा प्रवेश देण्याचे निर्देशित केले आहे. यामध्ये भविष्यात अडचणी येणार असून, शाळेत सुलभरितीने प्रवेश देण्याच्या धोरणामुळे हे परिपत्रक काढले आहे; परंतु हे परिपत्रक चुकीचे असून, याबाबत बहुजन कास्ट्राईक कर्मचारी, अधिकारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय हेरकर यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन देऊन यात सुधारणा करण्याची मागणी केली आहे.
पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत
मंठा : तालुका व परिसरात गत २०-२५ दिवसांपासून पाऊस झालेला नाही. पावसाअभावी उगवून आलेली खरिपातील पिके धोक्यात आली असून, अनेकांना आता दुबार पेरणीची चिंता सतावू लागली आहे. जून महिन्याच्या प्रारंभी झालेल्या पावसामुळे काही शेतकऱ्यांनी पेरणी केली, तर काही शेतकऱ्यांनी मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत पेरणी थांबविली आहे. तुरळक पावसावर शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. काही भागात सोयाबीनची पेरणी झाली आहे. परंतु, पावसाअभावी उगवून आलेली पिके सुकू लागली आहेत. वेळेत पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
एमआयएमचे निवेदन
जालना : जालना पालिकेतील वेगवेगळ्या विभागांमध्ये निकष डावलून कामे केली जात आहेत. याची चौकशी करावी, अशी मागणी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यात स्वच्छतेची कामे करताना ती नियम डावलून कंत्राटदाराला दिल्याचे म्हटले आहे.