मंठा : येथील कोविड सेंटरमध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याने कोविड रुग्णांना वेळेवर उपचार व औषधी मिळत नाही. त्यामुळे रुग्ण सीरियस होत असल्याची तक्रार नातेवाईक करीत आहेत.
येथील कोविड सेंटरला नुकतीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भेट दिली होती. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र गायके यांच्या दालनात बैठक घेऊन रुग्णांना वेळेत उपचार देण्याचे आदेश दिले होते. परंतु, आरोग्यमंत्र्यांच्या या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली असून, येथील कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी नातेवाइकांनी केल्या आहेत. कोविड रुग्णालयात डॉक्टरांच्या २४ तासांच्या ड्युटी लावण्यात आल्या आहेत. परंतु, डॉक्टर व कर्मचारी मनमानी कारभार करत असून, केवळ चार ते पाच तास ड्यूटी करीत आहे. रात्रीच्या वेळी डॉक्टर थांबत नसल्याने रुग्णांच्या तपासण्या व औषधे वेळेवर मिळत नसल्याचा आरोप रुग्णाचे नातेवाईक संजय वरकड यांनी केला आहे. रुग्ण सीरियस होऊन मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे. याबाबत वैद्यकीय अधीक्षक राजेंद्र गायके यांच्याशी संपर्क केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
माझ्या भावाला मंठा येथील कोविड रुग्णालयात भरती केले होते. नुकतीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. परंतु, येथे डॉक्टर हजर राहत नसल्याने त्यांना वेळेवर औषधी व उपचार मिळाले नाही. तीन दिवसात केवळ एक सलाइन लावण्यात आले. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सध्या त्यांची तब्येत खराब झाली असून, त्यांचा स्कोअर २१ झाला आहे. त्यामुळे त्यांना इतर रुग्णालयात हलविण्यात आले.
संजय वरकड, रुग्णाचे नातेवाईक