जालना : राज्यातील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली व जिल्हांतर्गत बदलीचा धोरणात्मक निर्णय हा सर्वसमावेशक असावा, अशी मागणी प्रहार शिक्षक व शिक्षकेतर संघटनेचे राज्य संपर्कप्रमुख संतोष राजगुरू यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हा अंतर्गत बदलीमध्ये संवर्ग एक व संवर्ग दोन यांच्या बदल्या झाल्यानंतर रिक्त जागा घोषित कराव्यात. ज्यामुळे उर्वरित बदली धारकांना रिक्त जागी बदली मागणे सोपे होईल. अशाच प्रकारे प्रत्येक फेरीनंतर रिक्त पदे अपडेट करून ती प्रसिद्ध करावीत. पती-पत्नी (सहशिक्षक-पदवीधर) ३० किलोमीटरच्या परिघात रिक्तपद नसल्यास ३० किलोमीटरच्या बाहेर बदली होऊ नये. संवर्ग चार करिता किमान-कमाल बदलीची टक्केवारी असावी. मुख्याध्यापकांना स्थानिक परिस्थितीवरील बदलाचे अधिकार द्यावेत, अवघड क्षेत्र पुर्नरचना व्हावी. बोगस संवर्ग एक व संवर्ग दोन यांनी बदली करून घेतल्यास कडक शिक्षेची तरतूद असावी. उपक्रमशील शिक्षकांना इच्छेनुसार बदलीतून सूट द्यावी, मुख्यालयाजवळ बदलीची संधी मिळावी. रँडमरायझेशन आणि विस्थापित शिक्षकांना संभाव्य बदल्यांमध्ये प्राधान्यक्रम देण्यात यावा. आंतर जिल्हा बदलीने उपस्थित झालेल्या शिक्षकांची मुळसेवा जिल्हांतर्गत बदलीसाठी ग्राह्य धरावी. आंतरजिल्हा बदली टप्पा पाच हा पोकळ बिंदूनुसार राबविण्याचा धोरणात्मक निर्णय घ्यावा. अतिरिक्त बिंदू व रिक्तपदाच्या १० टक्क्यांचा विचार न करता बदली प्रक्रिया राबवावी, यासह इतर विविध मागण्या राजगुरू यांनी निवेदनात केल्या आहेत.
कोट
यावर्षी शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदली निर्णय हा सर्वसमावेशक असावा, अशी मागणी सर्व शिक्षकांची आहे. या मागणीचा विचार करू, असे आश्वासन ग्रामविकास विभाग मंत्री हसन मुश्रीफ यांनी संघटनेला दिले आहे.
संतोष राजगुरू
प्रहार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना
फोटो