भोकरदन : शहरातील महसूल विभागाच्या जागेवर अतिक्रमण करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. अतिक्रमणाचा विळखा वाढत असताना महसूल विभागाकडून मात्र दुर्लक्ष केले जात आहे.
भोकरदन-जालना या मुख्य रस्त्याला लागून तहसील कार्यालय आहे. त्याच्यापुढे रस्त्यालगत सरकारी जमीन व त्याच्या पाठीमागे खासगी व्यावसायिकांची प्लॉटिंगची जमीन आहे. मात्र त्या ठिकाणी जाण्यासाठी अधिकृत रस्ता नाही. त्यामुळे अज्ञात व्यक्तींनी लाखो रुपये किमतीच्या सरकारी जमिनीवर जेसीबी व पोकलेनद्वारे जालना मुख्य रस्त्यापर्यंत मुरुमाची भरती टाकून सरकारची जमीन प्लाटिंगमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचप्रमाणे यापूर्वी सुद्धा या शासकीय जमिनीततून अवैधरीत्या रस्ते टाकण्याचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे या जमिनीवर अतिक्रमण करून शासकीय जमीन बळकविण्याचा सर्रास प्रकार सुरू आहे. त्याला लगाम लावण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पाहणी करून अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
कोट
सदर जमीन कोणाची आहे याची तपासणी केली जाईल. शासकीय जमिनीवर अतिक्रमण झाले असेल तर संबंधितांवर कारवाई केली जाईल.
संतोष गोरड, तहसीलदार, भोकरदन