जालना : कोरोना विषाणूवर परिणामकारक ठरेल, अशी लस दृष्टिपथात आलेली असतानाच आता लसीकरण मोहिमेसाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी शनिवारी जिल्ह्यातील तीन केंद्रांवर ड्राय रन घेण्यात आला. यात ७५ आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
हे ड्राय रन जिल्हा सामान्य रुग्णालय जालना, जिल्हा रुग्णालय अंबड, प्राथमिक आरोग्य केंद्र सेलगाव येथे पार पडले. सकाळी ९ वाजेच्या सुमारास या ड्राय रनला सुरुवात झाली. जालना शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील लसीकरण केंद्राला फुगे व आकर्षक रांगोळींनी सजविण्यात आले होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीकरण केंद्राला भेट दिली. त्यानंतर लसीकरणाचे प्रात्यक्षिक सुरू करण्यात आले. जवळपास २५ आरोग्य कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतला होता. सुरुवातीला सर्व लाभार्थ्यांच्या मोबाइलवर मेसेज पाठविण्यात आले. ज्या व्यक्तीला मेसेज आला, त्याच व्यक्तीला केंद्रात सोडण्यात आले. पोलिसांनी संबंधित व्यक्तीच्या मोबाइलवर मेसेज पाहून त्याला आत सोडले. पहिल्या रूममध्ये कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. दुसऱ्या रूममध्ये लसीकरण केले गेले. यावेळीच आरोग्य सेविकाने संबंधित व्यक्तीला चार संदेशही दिले. तिसऱ्या रूममध्ये लसीकरण झालेल्या व्यक्तीला अर्धा तास निगराणीत ठेवण्यात आले. त्यानंतर शिक्षकांनी कोविन अॅपवर संबंधित व्यक्तींची माहिती भरून घेतली. प्रत्येक केंद्रावर ६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यात आरोग्यसेविका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक व पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. यावेळी आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर, जिल्हा शल्यचिकित्सक अर्चना भोसले, डब्ल्यूएचओचे डॉ. मुजीब यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
लसीकरण केंद्राची सजावट
जिल्हा शासकीय रुग्णालयातील लसीकरण केंद्राची प्रशासनाने सजावट केली होती. यावेळी ठिकठिकाणी फुगे लावण्यात आले होते. केंद्रात आकर्षक रांगोळी काढण्यात आली. या रांगोळींमध्ये कोविड व्हॅक्सिनचे चित्र काढण्यात आले होते. या रांगोळींनी सर्वांनाच आकर्षित केले. ठिकठिकाणी सॅनिटायझर ठेवण्यात आले होते. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या सर्व नियमांचे पालन केले गेले.
यांनी बजावली सेवा
आरोग्यसेविका आर. डी. वसू यांच्याकडे लसीकरणाची जबाबदारी देण्यात आली होती, तसेच लसीकरण झाल्यानंतर त्यांनी संबंधित व्यक्तीला चार संदेशही दिले. आशा कार्यकर्ती ज्योती कुलकर्णी, अंगणवाडी सेविका वंदना केदारे, अरुणा चव्हाण, पोलीस कर्मचारी संदीप पवार, परमेश्वर पथरे यांनी केंद्रावर सेवा बजावली.
या कर्मचाऱ्यांचा सहभाग
कुमारसनी गुडेकर, महेश गायकवाड, नितीन गालपाडे, लक्ष्मी पाईकराव, श्रद्धाराणी पंडित, अनुजा दाणी, मनोज जाधव, प्रियंका निथुरकर, किरण वासू, पंकज शिंदे, साधना वारे, सतीश बोरडे, सोनाजी भुतेकर, मंगल राऊत, बाबासाहेब वाघ, तेजस्वीनी वाघमारे, प्रदीप बोरसे, राजेंद्र अंभोरे, कविता वाघमारे आदींनी सहभाग घेतला होता.
हा दिला जाणार संदेश
तुम्हाला कोरोनाची लस दिली जाणार आहे, त्या लसीपासून तुमचे संरक्षण होणार आहे.
तुम्हाला काही त्रास झाला तर तुम्ही शेजारच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन दाखवू शकता.
पुढची लस कधी आणि किती वाजता दिली जाणार याचा मेसेज तुम्हाला केला जाईल.
ही लस दिल्यानंतरही मास्क, सुरक्षित अंतर व सॅनिटायझरचा वापर करावा.