दानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूर ग्रामपंचायतच्या ९ जागेसाठी २१ उमेदवार आपले नशिब अजमावत आहेत. गावातील दोनही प्रमुख पॅनलमध्ये जवळचे नातेवाईक, मित्र आहेत. त्यामुळे मतदान नेमके कोणाला करावे? या संभ्रमात गावातील मतदार राजा असल्याचे दिसून येत आहे.
भोकरदन तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी पार पडत आहेत. दानापूर येथे प्रमुख दोनच पॅनलमध्ये ही लढत होणार आहे. गावातील नऊ जागांसाठी दोन पॅनलने प्रत्येकी ९ व अपक्ष तीन उमेदवार असे एकूण २१ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. विशेष म्हणजे ३० डिसेंबरपर्यंत गावातील दोन पॅनलमध्ये एकही उमेदवार उभा राहिला नव्हता. कारण, ग्रामस्थांची पूर्वजांवर नाराजी होती. ही बाब समजताच दोन्ही पॅनल प्रमुखांनी नव तरुणांना व महिलांना पॅनलमध्ये अधिकची संधी दिली. यंदा प्रथमच गावातील मातंग समाजातील उमेदवारही पॅनलमधून निवडणूक लढवत आहेत. तर इतर समाजाचे तीन उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
दानापूर येथे १८ पगड जाती- धर्माचे लोक राहतात. एकमेकांच्याच मतांवर उमेदवार निवडून येत असतो. त्यात कोनाला धरावे व कोणाला सोडावे, हे मात्र सध्या मतदारांना कळेनासे झाले आहे, तसेच पॅनल प्रमुखांकडून सोशल मीडियाचा आधार घेऊन अधिकचा प्रचार केला जात आहे. याबरोबरच मतदारांची भेट घेऊन ओळख पटवून देण्यावरही उमेदवारांनी भर दिल्याचे दिसून येत आहे.
पोशाखात बदल
ग्रामपंचायतच्या निवडणुकीत उभा राहिलेल्या उमेदवारांनी मागील पंधरा दिवसांपासून राहणीमान व पोशाखात बदल केला आहे. जो- तो चकचकीत कपडे घालून मतदारांना विविध आश्वासने देऊन आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करीत आहे.