भोकरदन : भोकरदन नगर परिषदेने शहरातील विविध कंपन्यांच्या १२ टॉवरला कर वसुलीच्या नोटिसा दिल्या आहेत. असे असतानाही कंंपन्यांनी थकबाकी भरलेली नाही. त्यामुळे मंगळवारी नगर परिषदेच्या पथकाने सर्वाधिक थकबाकी असलेल्या आयडिया कंपनीचे टॉवर सील केले आहे. शहरात विविध कंपन्यांचे १२ मोबाइल टॉवर आहेत. टॉवर कंपन्यांकडे करापोटी नगर परिषदेचे ३० लाख रुपये थकले आहेत. ज्या टॉवर कंपन्यांनी कराची थकबाकी भरली नाही, त्यांना नगर परिषदेच्या वतीने नोटीस देण्यात आल्या होत्या. नोटीस देऊनही कंपन्यांनी थकबाकी भरलेली नाही. त्यामुळे नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी सर्वाधिक थकबाकी असलेल्या आयडिया कंपनीचे टॉवर सील केले आहे. यावेळी कार्यालयीन अधीक्षक वामन आढे, करनिरीक्षक डी.टी. तायडे, कनिष्ठ अभियंता किशोर ढेपले, कैलास जाधव यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.
शहरातील १२ टॉवर कंपन्यांकडे नगर परिषदेची ३० लाख रुपयांची थकबाकी आहे. तातडीने थकबाकी भरण्यासाठी सर्वांना नोटिसा दिल्या होत्या. एकाही कंपनीने थकबाकी भरलेली नाही. आयडिया कंपनीकडे तब्बल १५ लाख ३८ हजार रुपयांची थकबाकी असल्याने मंगळवारी टाॅवर सील करण्यात आले. इतर कंपन्यांनी आठ दिवसांत थकबाकी न भरल्यास त्यांचे टॉवरदेखील सील केले जाईल.
-डी.टी. तायडे, करनिरीक्षक, नगर परिषद, भोकरदन