वीज ग्राहकांची गैरसोय
घनसावंगी : शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. थोडेही वारे सुटले अथवा पाऊस आला की, वीज गुल होत आहे. अचानक वीज गुल होत असल्याने ग्राहकांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. संबंधितांनी सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
सेवानिवृत्तीनिमित्त चाथे यांचा सत्कार
राजूर : भोकरदन तालुक्यातील चांधई एक्को येथील विनायक विद्यालयाचे शिक्षक बी.बी. चाथे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संस्थाध्यक्ष शेषराव ढाकणे, उपाध्यक्ष भगवान वाघमोडे, पंढरीनाथ तळेकर, मुख्याध्यापक सुनील जगताप, बी.व्ही. वाघमोडे, एस.एन. जगताप व इतरांची उपस्थिती होती.
जोरदार पावसाने बळीराजा सुखावला
जालना : जालना तालुक्यातील बहुतांश गावात सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे बळीराजा सुखावला असून, आता पेरणीसाठी शेतकऱ्यांनी लगबग सुरू केल्याचे दिसून येत आहे. मका सोयाबीन, मूग, उडीद, आदी पिके घेतात. आता सध्या शेतीची मशागत करून शेतकरी पेरणी करीत आहे. यंदा सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला दिसत आहे.
माहेरभायगाव रस्त्यावर जागोजागी खड्डे
अंबड : अंबड तालुक्यातील माहेरभायगाव ते हस्तपोखरी या अतिशय वर्दळीच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून या रस्त्यात कोणतीही सुधारणा करण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्याची दिवसेंदिवस वाट लागत आहे. विशेष म्हणजे, या रस्त्यावरून दहा गावांना ये-जा करता येते.
पानशेंद्रा येथे वृक्षारोपण
जालना : तालुक्यातील पानशेंद्रा येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि डॉ. बाबासाहेब आंबडेकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने येथील आदर्श शेतकरी विठ्ठल पाचरणे यांच्या शेताच्या बांधावर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विठ्ठल पाचरणे, विष्णू पाचरणे, दत्तात्रय पाचरणे आदी उपस्थित होते.
शिवराज्याभिषेक सोहळा साजरा
मठपिंपळगाव : जालना तालुक्यातील बठाण बु येथे गावकऱ्यांच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गावातील ११ जोडपे या ठिकाणी शिवरायांच्या रूद्र पूजनासाठी उपस्थित होते. याप्रसंगी सरपंच बालिका ज्ञानेश्वर देवडे, उपसरपंच सचिन बागल, वाल्मीक देवडे, शिवनेरी मित्र मंडळाचे पदाधिकारी हजर होते.
धावडा येथे धान्य कीट, साड्यांचे वाटप
धावडा : राजकुंवर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा डॉ. बाबासाहेब आंबेेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. डॉ. भगवानसिंग डोभाळ यांच्या वतीने धावडा व वाढोना येथील गरजवंतांना रविवारी २१ क्विंटल गहू, किराणा किट व आर्थिक सहाय करून महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. कोरोनामुळे अनेकांच्या हातची कामे गेली आहे. याचा सर्वाधिक फटका कामगार, शेतमजुरांना बसला आहे. अनेकांचे जगणे मुश्कील झाले आहे.
भोकरदन बाजारपेठेत नागरिकांची गर्दी
भोकरदन : तालुक्यातील कोरोनाचे रूग्ण घटू लागल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र, बाजारपेठेसह शहरातील विविध भागात सोमवारी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. अनेकांना कोरोनाचा विसर पडल्याचे चित्र होते. भोकरदन शहरास तालुक्यात मागील आठवड्यापासून कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. यंत्रणेने घेतलेल्या अथक परिश्रमांमुळे कोरोनाबाबत काहीसा दिलासा मिळालेला आहे. मात्र, सोमवारी अनलॉक झाल्यानंतर शहरात गर्दी पाहायला मिळाली.