जालना : छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले होते. या राज्यामध्ये सर्व जनता सुरक्षित व स्वातंत्र्याचे जीवन जगत होती. याचे कारण रयतेमध्ये समता होती, न्याय होता आणि स्वातंत्र्य होते, असे प्रतिपादन राजकुमार म्हस्के यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त संघर्षनगर इंदेवाडी येथे प्राचार्य राजकुमार म्हस्के यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी म्हस्के म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले होते. या राज्यामध्ये सर्व जनता सुरक्षित व स्वातंत्र्याचे जीवन जगत होती. याचे कारण रयतेमध्ये समता होती, न्याय होता आणि स्वातंत्र्य होते. सर्वसामान्यांचे जीवनमान सुखकर होण्यासाठी छत्रपती अहोरात्र झटत होते. छत्रपतींना सहा भाषांचे ज्ञान होते. आपल्या कुशल, शौर्यवान व्यक्तिमत्वाची छाप त्याकाळी छत्रपतींनी सर्वसामान्य माणसावर उमटवली होती. रयतेची मदत, सेवा करणे म्हणजेच पुण्य आणि रयतेला वाऱ्यावर सोडणे म्हणजे पाप होय, अशा महान विचारांची निर्मिती छत्रपतींनी त्याकाळी केली. त्यामुळे त्यांचे जीवनकार्य विश्वासाठी आदर्श ठरून त्यांच्या व्यवस्थापकीय कौशल्यावर देश-विदेशात अभ्यासक्रम आणि संशोधन केले जात आहे, असेही म्हस्के म्हणाले. यावेळी रमेश डोळसे, तांदुळवाडी सरपंच अण्णासाहेब चित्तेकर, वाघोळा उपसरपंच ज्ञानदेव घुगे, कपिल खरात, सुरेश उघडे, फकिरा वाघ, देविदास वाघ, बाळू बोर्डे, अरुण सुर्वे, मनोहर उघडे, प्रभू मनवर, सुनील निकाळजे, गणपत कांबळे, सिंधू वाघ, सुहास साळवे, विनोद वाघ, विकास वाघ आदी उपस्थित होते.