जालना : शहरातील कन्हैयानगर येथून बोलेरो पिकअप चोरणाऱ्यास चंदनझिरा पोलिसांनी बुधवारी अटक केली. दियासिंग बरयामसिंग कलाणी (रा. आझादनगर) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
१७ मार्च रोजी किशोर सुरा यांनी घरासमोर उभा केलेली बोलेरो पिकअप चोरीला गेली होती. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना, ती पिकअप दियासिंग बरयामसिंग कलाणी याने साथीदार गजानन शिंगाडे याच्यासह चोरल्याची माहिती पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांना मिळाली. या माहितीवरून जाधव यांनी पोलीस अंमलदार विलास आटोळे, अनिल काळे व चंद्रकांत माळी यांना पाठवून दियासिंग कलाणी यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याने ते वाहन साथीदारासह चोरल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. यशवंत जाधव, पोलीस हवालदार विलास अटोळे, साई पवार, नंदलाल ठाकूर, चंद्रकांत माळी, अनिल काळे यांच्यासह महिला कर्मचारी श्रद्धा गायकवाड यांनी केली.