केदारखेडा : येथील ग्रामपंचायतीच्या ११ सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीत सर्वच जागा भाजपला मिळाल्या आहेत.
या निवडणुकीत संदीप शेळके यांनी युवकांची मोठी फळी उभी करून भाजप पुरस्कृत श्री केदारेश्वर ग्राम विकास पॅनल रिंगणात उतरविले होते. त्यांच्या विरुद्ध भाजपचे रमेश मुरकुटे यांनी राष्ट्रवादीला सोबत घेऊन प्रस्थापितांच्या साथीने निवडणुकीत पॅनल उभे केले होते; परंतु जनतेने त्यांचा पराभव केला आहे. प्रस्थापितांचा हा पराभव मोठा धक्का देणारा ठरला आहे. केदारखेडा येथील जनतेनी संदीप शेळके यांच्या पॅनलला भरभरून यश दिले असून, मोठ्या मताच्या फरकाने विजयी केले आहे. नवख्या चेहऱ्याकडून विकासाची अपेक्षा बाळगून दणदणीत विजय केला आहे. यामध्ये पंडित जाधव, सतीश शेळके, वर्षा जाधव, ज्योती मोरे, ज्ञानेश्वर जाधव, बाबासाहेब राऊत, वत्सला जाधव, कासाबाई तांबडे, सरसाबाई कांबळे, शारदा काळे, दीपा मैद हे उमेदवार विजयी झाले आहेत. विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करीत फटाक्याची आतषबाजी करून घोषणाबाजी करून जल्लोष साजरा केला.
कोट
जनतेने आम्हाला भरघोस मतांनी विजयी केले आहे. आमच्यावर जनतेने दाखविलेला विश्वास वाखणण्याजोगा आहे. या विजयाने आम्ही हुरळून न जाता सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करून पुढील पाच वर्षे गाव विकासासाठी कटिबद्ध राहणार आहोत.
-संदीप शेळके, पॅनलप्रमुख