घनसावंगी तालुक्यात ५४ ग्रामपंचायतींपैकी ३४ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. बदनापूरमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना आणि भाजप, अशी चौरंगी लढत झाली. त्यात बदनापूर तालुक्यातील सोमठाणा शिवसेनेकडे आली असून, ही ग्रामपंचायत काँग्रेसच्या ताब्यात होती, असे माजी आ. संतोष सांबरे यांनी सांगितले. अंबड तालुक्यातही राष्ट्रवादीचेच वर्चस्व राहिले. दरम्यान, अंबड तालुक्यातील रोहिलागड, ताडहदगाव या मोठ्या ग्रामपंचायतींवर शिवसेनेने यश मिळविले आहे.
चौकट
भाजपला अनेक ठिकाणी मोठे धक्के
एकीकडे भाजपकडून बालेकिल्ला राखला असल्याचा दावा केला जात आहे; परंतु भोकरदन तालुक्यातील अनेक मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायती या भाजपच्या ताब्यातून गेल्या आहेत. त्यामुळे एकप्रकारे भाजपसाठी ‘गड आला; पण सिंह गेला’ अशी स्थिती झाली आहे. ज्या मोठ्या ग्रामपंचायती आहेत, त्यात सिपोरा बाजार, पिंपळगाव रेणुकाई, जळगाव सपकाळ, सुरंगळी, फत्तेपूर, कठोरा बाजार यांचा समावेश आहे. जवळपास १३ मोठ्या ग्रामपंचायतींत भाजपला धक्का बसल्याचे सांगण्यात येते.