वरूड (बु.) : भोकरदन ते वरूड (बु.) या २० किलोमीटर मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे चालकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत असून, प्रवाशांचीही गैरसोय होत आहे. याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
भोकरदन ते वरूड (बु.) या मार्गाची मोठी दुरवस्था झाल्याने अपघात वाढले होते. रस्ता दुरुस्तीसाठी संस्था, संघटनांसह युवकांनी पाठपुरावा केला होता. आमदार संतोष दानवे यांच्या प्रयत्नांनंतर दोन वर्षांपूर्वी काम करण्यात आले आहे. परंतु, दोन वर्षांतच या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रविवारी दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. दिवसागणिक या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढत आहे. बांधकाम विभागाकडून केली जाणारी दुरुस्तीही थातूरमातूर केली जात आहे. त्यामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात जात आहेत. या मार्गावर वळणाच्या ठिकाणी योग्य स्लूप घेण्यात आलेले नाहीत. शिवाय दिशादर्शक फलकही लावण्यात आलेले नाहीत, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
विशेष म्हणजे हा रस्ता विदर्भ व खान्देशाला जोडणारा असल्यामुळे या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. पिंपळगाव रेणुकाई येथील मिरची बाजार हा जिल्ह्यातील सर्वांत मोठा बाजार असतो. त्यामुळे याच मार्गावरून अनेक शेतकरी, व्यापाऱ्यांचा प्रवास असतो. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
खड्ड्यांमुळे वरूड (बु.) येथूून भोकरदनकडे जाण्यासाठी अधिक वेळ लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघात वाढले असून, वाहनांचेही नुकसान होत आहे. अनेकांचा जीव अपघातात गेला आहे. सध्या सुरू असलेली डागडुजीही व्यवस्थित केली जात नाही.
गजानन जाधव
वाहनचालक
फोटो