बाजारपेठेमधील मोसंबीची आवक घटली
जालना : शहरातील नवीन मोंढ्यातील मोसंबीची आवक घटली आहे. परिणामी मोसंबीचे भाव १५ ते २० हजार रूपये प्रतिटनावर गेले आहेत. आवक नसल्याने मोसंबी मार्केटमध्ये हमाल, मोसंबींची प्रतवारी करणाऱ्या महिलांच्या हाताला काम नाही. त्यामुळे बाजारपेठेतील वर्दळही कमी झाल्याचे दिसून येत आहे.
बाळासाहेब ढेरे यांची तालुकाध्यक्षपदी निवड
जालना : तालुक्यातील बोडखा येथील बाळासाहेब ढेरे यांची पोलीस मित्र युवा महासंघाच्या घनसावंगी तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष प्रा. नितीन जैस्वाल, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब ढमाले यांनी ढेरे यांची निवड केली आहे. या निवडीचे तालुक्यात सर्वत्र स्वागत होत आहे.
बाजारपेठेमधील कापसाचे दर वधारले
जालना : जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या बाजारपेेठेतील कापसाचे दर वधारले आहेत. पूर्वी कापसाचे दर ५ हजार रूपये क्विंटलपर्यंत खाली आले होते. सध्या ५ हजार ८०० ते ६ हजार रूपयांपर्यंत कापसाला दर मिळत असल्याचे दिसत आहे. बहुसंख्य शेतकऱ्यांनी कापूस विकल्याने या दरवाढीचा मात्र, मोजक्याच शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
खंडित वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय
अंबड : महावितरण कंपनीकडून थकीत वीज बिलापोटी कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हाती आलेली पिके वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. तरी संबंधितांनी लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.