वडीगोद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी साष्टपिंपळगाव (ता. अंबड) येथील ग्रामस्थांच्यावतीने २० जानेवारीपासून राज्यव्यापी आंदोलन लढा उभारण्यात येत आहे. याच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी गावातून बैलगाडीसह, ट्रॅक्टर आणि मोटारसायकलसह रॅली काढून आरक्षण जनजागृती केली.
केंद्र आणि राज्य या दोन्हीही सरकारने एकत्रित भूमिका घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे, या मागणीसाठी २० जानेवारीपासून साष्टपिंपळगाव येथे गावकऱ्यांच्यावतीने ठिय्या आंदोलन पुकारले जाणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी फेरी काढून ‘एक मराठा लाख मराठा’, ‘मराठ्यांना आरक्षण मिळायलाच पाहिजे’, ‘कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’, अशी घोषणाबाजी करून गावाचा परिसर दणाणून सोडला. २५ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणी होणार असून, केंद्र आणि राज्य सरकारने मराठ्यांना कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळण्यासाठी योग्य बाजू मांडून आरक्षण मिळवून द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला आहे.