नगर परिषदेच्या महात्मा फुले सभागृहात शुक्रवारी स्थायी समितीच्या सदस्यांच्या नगर परिषदेचा सन २०२१-२२ चा भांडवली व महसुली रकमेच्या जमा व खर्चाच्या या अंदाजपत्रकास मान्यता देण्यासाठी सभेचे आयोजन केले होते. या सभेला नगराध्यक्ष सुनीता शिंदे, उपाध्यक्ष प्रवीण झोरे, आरोग्य समिती सभापती विष्णू रामाने, बांधकाम समिती सभापती हनिफ शहा, महिला व बालकल्याण समिती सभापती दीपमाला गोमधरे, मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, लेखापाल संजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. स्थायी समितीसमोर सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात महसुली जमा रकमेत १७ कोटी ५७ लाख ५२ हजार ७२६, तर भांडवली जमा रकमेत २५ कोटी २४ लाख ८० हजार ४६ रुपयांची तरतूद करण्यात आली. महसुली खर्चात १७ कोटी ५७ लाख ७२ हजार ५२६ रुपये, तर भांडवली खर्चात २५ कोटी ४५ लाख ४५ हजार २६ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या अंदाजपत्रकात ५ लाख ३० हजार रुपये शिलकीचा अंदाजपत्रक सादर करण्यात आला आहे.
शहरातील विविध विकास कामे करण्यासाठी तेरावा, चौदावा व पंधरावा वित्त आयोग निधी, राष्ट्रीय नागरी उपजीविका अनुदान, दीनदयाल अंत्योदय योजना अनुदान, घनकचरा व्यवस्थापन, वैशिष्ट्यपूर्ण निधी, विदर्भ वैधानिक विकास अनुदान, अंगणवाडी बांधकाम अनुदान, पथदिवे व ऊर्जासंवर्धन यासह विविध विकास कामांसाठी निधी मंजूर करून आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. खेळीमेळीच्या वातावरणात अवघ्या ५ मिनिटांत या अर्थसंकल्पास मान्यता देण्यात आली. यावेळी नगर परिषदचे लेखापाल संजय जाधव, सभा प्रमुख सुरेश शर्मा, नामदेव भोंडे, चंदेश तायडे, विलास अहिरे, भगवान राऊत, गणेश शर्मा आदींची उपस्थिती होती.