जालना : शोषित व उपेक्षित समाजाच्या व्यथा आपल्या साहित्यातून मांडून सामाजिक क्रांतीचा विचार देणारे अण्णा भाऊ साठे हे बहुजन चळवळीचे खरे नायक आहेत, त्यांचे विचार तरुण पिढीने आत्मसात करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन नांदेड येथील विचारवंत तथा बीसीईएफचे प्रदेशाध्यक्ष एच. पी. कांबळे यांनी येथे केले.जालना येथील लोकमंगल प्रतिष्ठानतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे व्याख्यान मालेचे दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कचरु साळवे, अॅड. शिवाजीराव आदमाने, मनसेचे जिल्हाध्यक्ष रवि राऊत आदींची उपस्थिती होती.यावेळी आपले विचार मांडताना कांबळे म्हणाले की, समाज व्यवस्थेने नागवलेल्या माणसांना जगण्यासाठी पुरेशी संधी नव्हती. अस्तित्व टिकवून जगण्यासाठी धडपडणाऱ्या अशा माणसांना नायक आणि नायिका बनवून अण्णा भाऊंनी त्यांना जगासमोर आणले. त्यांच्यातील लढाऊ वृत्ती दाखवून दिली. अण्णा भाऊंचे नायक आणि नायिका कष्टकरी आहेत तसेच स्वाभिमानी आणि बंडखोरही आहेत. त्यामुळेच ते सामान्य माणसांना जगण्यासाठी बळ देतात. विपुल असे साहित्य लेखन करुनही अण्णा भाऊ साठे उपेक्षित राहिले. जसे त्यांचे साहित्य उपेक्षित राहिले. तशीच उपेक्षा त्यांच्या जीवनातही आली. शाहु-फुले-आंबेडकरांचे विचार सोबत घेवून लढणारे अण्णा भाऊ हे विद्रोही साहित्यिक आहेत. तसेच आपल्या बहुजन चळवळीला परिवर्तनाचा विचार देणारे नायकही आहेत. मातंग समाजाने अण्णा भाऊंचे विचार आत्मसात करुन फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या चळवळीसोबत रहावे तरच त्यांचा विकास होईल. सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी अण्णा भाऊंचे विचार आत्मसात करण्याची गरज कांबळे यांनी विषद केली. यावेळी कचरु साळवे, अॅड. आदमाने राऊत आदींनी विचार मांडले.अध्यक्षीय समारोपात अंबेकर म्हणाले, महापुरुषांचे विचार आत्मसात करण्याची नितांत गरज आहे. महापुरुषांचे विचार पेरण्याचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना समाजाने पाठबळ देण्याची गरज असून, परिवर्तनाचा विचारच समाजाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाईल, असे ते म्हणाले.प्रारंभी व्याख्यानमालेचे कार्याध्यक्ष संजय खोतकर, सचिव अशोक घोडे, उपाध्यक्ष शेख इब्राहिम, गणेश चांदोडे, सहसचिव हरेश रत्नपारखे, सदस्य डॉ. बालासाहेब पिंपळे आदींनी प्रमुख मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद सावंत यांनी केले. हरेश रत्नपारखे यांनी आभार मानले.यावेळी शिवसेनेचे पंडितराव भुतेकर, मनसेचे ज्ञानेश्वर गायकवाड, अॅड. बी. एम. साळवे, अशोक साबळे, डॉ. विजयकुमार कुमठेकर, सुधाकर निकाळजे, रोहिदास गंगातिवरे, अॅड. कैलास रत्नपारखे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व महिलांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)सामन्य बनले नायक़.. समाज व्यवस्थेने नागवलेल्या माणसांना जगण्यासाठी पुरेशी संधी नव्हती. अस्तित्व टिकवून जगण्यासाठी धडपडणाऱ्या अशा माणसांना नायक आणि नायिका बनवून अण्णा भाऊंनी त्यांना जगासमोर आणले. त्यांच्यातील लढाऊ वृत्ती दाखवून दिली.
अण्णा भाऊ साठे हे बहुजन चळवळीचे खरे नायक
By admin | Updated: July 31, 2014 00:46 IST