जयदेववाडी येथे गेल्या १९ फेब्रुवारीपासून कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. येथे आतापर्यंत तब्बल ७८ रूग्ण आढळून आले आहेत. सोमवारी ६ रूग्ण आढळून आले आहेत. तर १४४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामुळे हे कोरोना हॉटस्पॉट ठरत असून, आरोग्य विभागाकडून ग्रामस्थांची चाचणी केली जात आहे. जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर व उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार संतोष गोरड, गटविकास अधिकारी उदयसिंह राजपूत यांनी गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी आरोग्य विभागाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय खबरदारी घेतली जात आहे, याचा आढावा घेतला. तसेच ग्रामस्थांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. ग्रामपंचायत प्रशासनाला संपूर्ण गाव निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना दिल्या.
धावडा व वालसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ४ पथकाद्वारे नागरिकांची चाचणी केली जात आहे. २,५०० पैकी आतापर्यंत साडेसहाशे जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यात ७८ जण पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. गाव पूर्णपणे सील करण्यात आले आहे. यावेळी ग्रामसेवक प्रशांत रिंढे, उपसरपंच सुधाकर उदरभरे आदींची उपस्थिती होती.