जालना : फोन-पेवरून तब्बल ३ लाख ९४ हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल ऑनलाईन पद्धतीने लंपास करणाऱ्या आरोपीला सायबर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून एक लाख ३३ हजार ८० रुपयांची रोकड व इतर असा एकूण एक लाख ३४ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जालना शहरातील शिवाजी चौक ते गंगा हॉटेल दरम्यान मंदिपसिंग राजवीरसिंग (रा. बिजनेर उत्तर प्रदेश) यांचा मोबाईल ५ ऑगस्ट रोजी हरवला होता. त्यांच्या मोबाईलमधील फोन-पे ॲपचा वापर करून चोरट्यांनी ५ ते ९ ऑगस्ट या कालावधीत मंदिपसिंग यांच्या खात्यावरून तीन लाख ३४ हजार ४९० रुपयांची रोकड लंपास केली होती. या प्रकरणी सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हा गुन्हा सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पोलिसांनी विविध माध्यमातून तपास करीत या प्रकरणात केतन शाम नखलव (रा. प्रियदर्शनी कॉलनी, संभाजीनगर जालना) याला ८ सप्टेंबरला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर पथकांनी भुसावळसह इंदौर, खंडवा, बुऱ्हाणपूर, खरगोन, आदी भागात जाऊन एक लाख ३४ हजार १३० रुपयांची रक्कम जप्त केली. तसेच इतर साहित्यही ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास गुणाजी शिंदे हे करीत आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय अधिकारी सुनील पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर ठाण्याचे प्रमुख गुणाजी शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक कीर्ती पाटील, पोलीस उपनिरीक्षक डी. आर. दराडे, शिवाजी देशमुख, सुधीर गायकवाड, अंबादास साबळे, लक्ष्मीकांत आपेड, सतीश गोफणे, गणेश राठाेड, रईस शेख, संदीप मांटे, इरफान शेख, दिलीप गुसिंगे, पोलीस नाईक संगीता चव्हाण, अर्चना आधे, रेखा घुगे यांच्या पथकाने केली.
फोटो