परतूर : तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतींच्या ३१६ जागांसाठी ६९५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
परतूर तालुक्यात कार्यकाळ संपलेल्या ३८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण भागात राजकीय धुराळा उडाला आहे. आपली ग्रामपंचायत निवडून आणण्यासाठी सर्वच पक्षांचे नेते मंडळी कामाला लागले आहेत. या निवडणुका गावपातळीवरील प्रश्नावर व वैयक्तिक हेव्या- दाव्यावर आधारित असतात. त्यामुळे प्रत्येक गावात चुरस निर्माण झाली आहे. ३८ ग्रामपंचायतींसाठी ३१६ जागा आहेत. यात प्रभागांची संख्या ११९ आहे. नामनिर्देशन मागे घेतल्यानंतर ६९५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूणच या निवडणुका अटी- तटीच्या होत असल्याने प्रचारातही चुरस वाढली आहे.
बिनविरोधमध्ये महिलांची बाजी
परतूर तालुक्यातील ७ ग्रामपंचातींमध्ये १३ सदस्य बिनविरोध निवडल्या गेले आहेत. यामध्ये मसला ग्रमापंचायतीतील ३, लिखित पिंप्री ३, वाहेगाव सातारा ३, तर लिंगसा, हनवडी/गणेशपूर/तोरणा, परतवाडी, वलखेड या ग्रामपंचायतीतीतून प्रत्येकी एक सदस्य निवडला गेला आहे. यामध्ये महिलांनी बाजी मारली आहे. यात १३ पैकी ८ महिला सदस्य बिनविरोध निवडून आल्या आहेत.