जालना : परतीचा पाऊस आणि अतिवृष्टी यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फळबागा आणि अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी राज्य शासनाकडून मदत म्हणून ५२,२२७.४६ लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. यातील अर्ध्या रकमेचे यापूर्वी पहिल्या टप्प्यात वाटप करण्यात आले असून, आता दुसऱ्या टप्प्याचा निधी जिल्हा प्रशासनाला गुरुवारी मिळाला आहे.
निसर्गाच्या अवकृपेमुळे शेती करणे दिवसेंदिवस अवघड बनत चालले आहे. कधी कोरडा, तर कधी ओला दुष्काळ पडत असल्यामुळे शेती करणे जिकिरीचे बनत चालले आहे. कधी नव्हे तो गतवर्षी वेळेवर पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्या आशा-अपेक्षा उंचावल्या होत्या. वेळेवर जिल्ह्यात खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाली. पिकांच्या वाढीप्रमाणे पाऊस येत राहिल्याने पिकेही चांगली आली होती; परंतु उडीद, मूग, सोयाबीन काढणीला येताच सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे होत्याचे नव्हते झाले. यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासन स्तरावरून बाधित पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली होती. यानुसार पहिल्या टप्प्यात २६११३.७३ लाख रुपयांचे ५ लाख ५३ हजार ७६७ शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले होते; परंतु ही पहिल्या टप्प्यातील मदत शेतकऱ्यांना कमी पडली होती. यातच गुरुवारी पुन्हा २६११३.७३ लाख रुपये जिल्हा प्रशासनाला मिळाले असून, ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे काम सुरू झाले आहे.
शासन स्तरावरून मिळणारी मदत तोकडी
खरीप हंगामातील पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी शासन स्तरावरून देण्यात येणार मदत फार तोकडी आहे. या मदतीतून पिकांवर झालेला खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे देण्यात येणाऱ्या मदतीत वाढ करण्यात यावी.
- भिकनराव वराडे, शेतकरी, नळणी