कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून लसीकरण मोहिमेलाही गती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, शासनस्तरावरून जिल्ह्याला पुरेशा प्रमाणात लसीचा पुरवठा होत नसल्याने लसीकरण मोहिमेवर परिणाम झाला आहे. मागील काही दिवसांमध्ये जिल्ह्यातील कोविशिल्डची लस संपली होती. लसीचा साठा संपल्याने ज्या केंद्रांवर कोविशिल्डचे लसीकरण केले जात होते ती केंद्रे बंद करण्याची वेळ आरोग्य विभागावर आली होती, तर केवळ उपलब्ध कोव्हॅक्सिनचे डोस दिले जात होते. परंतु, शुक्रवारी जिल्ह्याला ३७ हजार ५०० डोस उपलब्ध झाले आहेत. यात कोविशिल्डचे ३० हजार, तर कोव्हॅक्सिनचे ७५०० डोस उपलब्ध झाले आहेत. या डोसचे केंद्रनिहाय वाटप करण्यात आले आहे. त्यानुसार शनिवारी जिल्ह्यातील तब्बल १२६ लसीकरण केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे.
केवळ ९ टक्के लोकांना दोन्ही डोस
आजवर जिल्ह्यातील चार लाख ८८ हजार ८३६ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. याचे प्रमाण २९ टक्के आहे.
जिल्ह्यातील एक लाख ४८ हजार ८२८ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. याचे प्रमाण केवळ ९ टक्के आहे.
तर ५१ टक्के हेल्थ वर्कर, ४५ टक्के फ्रंटलाइन वर्कर, १८ ते ४४ वयोगटातील ३ टक्के, ४५ ते ६० वयोगटातील ११, तर केवळ १९ टक्के ज्येष्ठ नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.