पारध : भोकरदन तालुक्यातील पारध (बु) ग्रामपंचायत कार्यालयाच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ३० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून, दोन पॅनलमध्ये अत्यंत चुरशीची ही लढत होणार असल्याचे चित्र आहे. तर आतापासूनच गावात प्रचाराच्या तोफा सुरू झाल्या आहेत.
भोकरदन तालुक्यात पारध (बु) ही पंधरा सदस्य असणारी आणि सर्वात मोठी लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव यांनी इतर पक्षांची आघाडी करून गेल्या ३५ वर्षांपासून सत्ता असलेल्या भाजपच्या गडाला सुरुंग लावून येथे एकहाती सत्ता आणली होती. त्यामुळे हा विजय भाजपच्या जिव्हारी लागला असल्यामुळे या निवडणुकीत भाजप- राष्ट्रवादी, काँग्रेस अशी आघाडी करून पॅनल प्रमुख माजी सभापती आणि राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस प्रा. संग्रामराजे देशमुख हे कार्यकर्त्यासह सर्व तयारीनिशी निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
केंद्रीय राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे, माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी ही ग्रामपंचायत अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. त्यांच्या पॅनलने आता प्रचार सुरु केला आहे. शिवसेनेचे मनीष श्रीवास्तव, शेखर श्रीवास्तव यांनी पॅनल उभे केले आहे. पाच वर्षांच्या काळात गावांत कोणकोणत्या विकास योजना राबविल्या, भविष्यात कोणते विकासकामे करणार आहे. हे मतदारांना पटवून देत आहेत. या निवडणुकीत दोन्ही पॅनलकडून युवा, नवख्या उमेदवारांना संधी दिल्यामुळे निवडणुकीत मोठी चुरस वाढणार आहे. मतदार त्यांना कितपत सहकार्य करतात हे मात्र निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे चित्र आहे. निवडणूक प्रचाराची मोठी रणधुमाळी सुरू झाली असल्यामुळे विविध वॉर्डात उमेदवार, कार्यकर्ते यांच्या भेटी-गाठी, बैठका, कॉर्नर बैठका रात्री उशिरापर्यंत होत आहेत. निवडणुकीतील डावपेच आखले जात आहे. तर एकाच कुटुंबातील भाऊ, काका, पुतण्या दोन पॅनलमध्ये दिसत आहेत.