दीपक ढोले
जालना : भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेनंतर राज्यातील सर्वच जिल्ह्यांतील शासकीय कार्यालयांसह सामान्य रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांची अग्नी सुरक्षा तपासणी (फायर सेफ्टी ऑडिट) करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती गठित करून, फायर सेफ्टी ऑडिट सुरू करण्यात आले आहे. या समितीने आतापर्यंत जालना शहरातील २९ कार्यालयांची तपासणी केली आहे. या सर्वच कार्यालयांतील अग्निशमन यंत्रे दहा वर्षांपूर्वीची असल्याचे समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
भंडारा जिल्ह्यात बाल रुग्णालयात आग लागून १० बालकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्याच दृष्टीने राज्य शासनाने राज्यातील सर्वच शासकीय कार्यालयांसह रुग्णालयांतील अग्नी सुरक्षा यंत्रणेचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे जालन्यातही जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रवींद्र बिनवडे यांनी अग्नी सुरक्षा परीक्षण (फायर सेफ्टी ऑडिट) करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. ही समिती जालना जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच रुग्णालयांच्या अग्नी सुरक्षा परीक्षणाचे काम करीत आहे. १५ फेब्रुवारीपासून ही समिती सर्वच कार्यालयांची तपासणी करीत आहे. या समितीने आतापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षक, जिल्हा सामान्य रुग्णालयांसह २९ कार्यालयांची तपासणी केली आहे. दरवर्षी अग्निशमन यंत्र रीफिल करणे गरजे असते. तसेच दर तीन वर्षांनी अग्निशमन यंत्र बदलावे लागते; परंतु बहुतांश कार्यालयांतील अग्निशमन यंत्र १० वर्षांपूर्वीचे असल्याचे समितीच्या निदर्शनास आले. ही समिती सदरील अहवाल जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे सादर करणार असल्याचे सूत्रांनी सांगिलते.
ही आहे समिती
जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या अग्नी सुरक्षा परीक्षण पथक समितीत पथक प्रमुख म्हणून औरंगाबाद येथील महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख मोहन मुंगसे, तसेच याच विभागातील प्रसाद शिंदे, जालना नगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील सोनवणे, सार्वजनिक बांधकाम विभाग जालना येथील कनिष्ठ अभियंता व्ही.ई. शेरकर, परतूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता महिंद्रकर, सामान्य रुग्णालयाचे लेखाधिकारी चंद्रकांत मुंढे, वैद्यकीय पर्यवेक्षक एस.जे. मगर यांचा समावेश आहे.
५ मार्चपर्यंत करणार आठ तालुक्यांत पाहणी
जालना जिल्ह्यातील आठ ग्रामीण रुग्णालये, अंबड येथील एक उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालयाच्या दोन्ही इमारती, शहरातील गांधी चमन परिसरातील स्त्री रुग्णालय यांच्यासह जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची अग्नी सुरक्षा तपासणी ही समिती करणार आहेत. यासाठी ५ मार्चपर्यंत कालावधी देण्यात आला आहे.
कर्मचारी अज्ञान
प्रत्येक कार्यालयात अग्निशमन यंत्र हाताळण्यासाठी काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणदेखील दिले जाते; परंतु या समितीने केलेल्या तपासणीत एकाही कर्मचाऱ्यांना अग्निशमन यंत्र हाताळण्याचे ज्ञान नसल्याचे समोर आले आहे. समितीने आता पुन्हा या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.
===Photopath===
240221\24jan_21_24022021_15.jpg
===Caption===
एका कार्यालयातील अग्निशमन यंत्राची पाहणी करताना पथक