जालना : तालुक्यातील ८५ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदानप्रक्रिया होत आहे. हे मतदान यशस्वी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेली २६१ पथके गुरुवारी मतदान केंद्राकडे रवाना झाली. ही मतदानप्रक्रिया यशस्वी व्हावी यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले आहे.
तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास २७ क्षेत्रीय अधिकारी, ३५ निवडणूक निर्णय अधिकारी तसेच ३५ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, जवळपास १८०० मतदान अधिकारी या निवडणुकीमध्ये आपले कर्तव्य पार पडणार आहेत. पोलीस प्रशासनाकडूनही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. तालुका पोलीस स्टेशन, चंदनझिरा, मौजपुरी, सेवली तसेच कदीम जालना, सदर बाजार, पोलीस मुख्यालय, पोलीस उपाधीक्षक कार्यालय येथील अधिकारी, कर्मचारी असे ४०० जणांची टीम सुरक्षेचे काम पाहणार आहे. मौजपुरी ठाण्यांतर्गत २९ ग्रामपंचायती असून, वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे सपोनि एस.डी. रामोड यांनी सांगितले. मकरसंक्रांत असतानाही महिलांनी मोठा उत्साह दाखवला असल्याचे क्षेत्रीय अधिकारी गीता नाकाडे यांनी सांगितले. या मतदानप्रक्रियेसाठी तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली परिवीक्षाधीन उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, परिवीक्षाधीन तहसीदार शीतल बंडगर, तहसीलदार तुषार निकम, नायब तहसीलदार निवडणूक दिलीप सोनवणे, मनुष्यबळ व्यवस्थापनाचे जी.एल. सर्वे, अनिल पाटील, संदीप गाढवे, विश्वास भोरे, संदीप डोंगरे, पी.एस. रायमल, कल्याण गव्हाणे, के.के. कुलकर्णी, एस. एल. चौधरी, वाय.आर. कुलकर्णी, के.आर. डहाळे हे ग्रामपंचायत निवडणुकीत कर्तव्य पार पाडत आहेत.
प्रक्रियेवर बारीक लक्ष
मतदानप्रक्रियेची संपूर्ण तयारी झाली असून, पथकेही गावोगावी रवाना करण्यात आली आहेत. शुक्रवारी होणाऱ्या मतदानप्रक्रियेवर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
श्रीकांत भुजबळ, तहसीलदार