वॉशिंग्टन : अॅमेझॉन इन्कॉर्पोरेटेड या आॅनलाइन मार्केटिंगच्या क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या कंपनीचे संस्थापक मालक जेफ बेझोस आणि त्यांची पत्नी मॅकेन्झी बेझोस यांच्या सहमतीच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झाले आहे. पोटगी म्ह़णून पतीकडून पत्नीला ३८.३ अब्ज डॉलरची (सुमारे २५ लाख कोटी रुपये) संपत्ती देणारा जगाच्या इतिहासातील आजवरचा हा सर्वात महागडा घटस्फोट ठरला आहे.
गेली २५ वर्षे पती-पत्नी असलेल्या जेफ व मॅकेन्झी या दाम्पत्याने विभक्त होण्याचा आपला इरादा गेल्या जानेवारीत टिष्ट्वटरवर जाहीर केला होता. या घटस्फोटासाठी दोघांमध्ये झालेल्या समझोत्यावर सिएटल येथील न्यायालयाने शुक्रवारी शिक्कोमोर्तब केले. आकडा वाचूनही सर्वसामान्यांना भोवळ येईल एवढी संपत्ती फारकतीसाठी पत्नीच्या हवाली करूनही जेफ बेझोस यांचे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती हे अव्वल स्थान व अॅमेझॉन कंपनीवरील नियंत्रण अबाधित राहील.
अॅमेझॉनचे चार टक्के भागभांडवल नावावर झाले तरी त्याचे कंपनीच्या सभांमधील मतदानाचे हक्क मात्र मॅकेन्झी यांनी जेफ यांच्याच हाती पुन्हा सुपूर्द केले आहेत. त्यामुळे अॅमेझॉनचे नियंत्रक मालक ही जेफ यांची बिरुदावली कायम राहील. (वृत्तसंस्था)