इस्लामाबाद : पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांची २००७ साली हत्या आपण केल्याचा दावा पाकिस्तानी तालिबानींनी केला आहे. सत्तेवर आल्यास अमेरिकेशी हातमिळवणी करून मुजाहिद्दिनांविरोधात कारवाई करण्याचा त्यांचा मनसुबा होता. त्यामुळे आम्ही त्यांना ठार मारले, असे तालिबानी संघटनेने प्रसिद्ध केलेल्या एका पुस्तकात म्हटले आहे.मुजाहिद-ए-इस्लाम या संघटनेवर कारवाई करण्याबद्दल अमेरिकेने बेनझीर यांना योजना आखून दिली होती, अशी माहिती पाकमधील तालिबानी नेता बैतुल्ला मसूद याला मिळाली होती, असे ‘इन्किलाब मसूद साऊथ वझिरिस्तान - फ्रॉम ब्रिटिश राज टू अमेरिकन इम्पिरिअॅलिझम’ या पुस्तकात नमूद करण्यात आले आहे. बेनझीर यांच्या हत्येची जबाबदारी आजवर कोणी स्वीकारलेली नव्हती.बेनझीर यांनी २७ डिसेंबर २००७ रोजी सभेत भाषण केले. त्यानंतर मिरवणुकीने त्या जात असताना आत्मघाती हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली. ही हत्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या संघटनेने केल्याचा आरोप पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी केला होता. मात्र या संघटनेने त्या आरोपाचा इन्कार केला होता.बिलाल उर्फ सईद व इक्रमउल्ला या दोघांवर बेनझीरना ठार करण्याची कामगिरी सोपविण्यात आली होती, असा दावा पुस्तकात आहे. मिरवणुकीमध्ये आत्मघाती बॉम्बर बिलालने प्रथम बेनझीर यांच्यावर आपल्याकडील पिस्तुलाने गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी बेनझीरच्या मानेत घुसली. त्यानंतर बिलालने आत्मघाती बॉम्बहल्ला केला.
बेनझीर भुत्तो यांची हत्या आम्ही केली, पाकिस्तानी तालिबानी संघटनेने केला दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 15:08 IST