इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे जगाचा लाईफलाईन मार्ग मानली जाणारी होर्मुझची सामुद्रधुनी सध्या धोक्याच्या छायेत आहे. इराणने या मार्गावर पसरलेले संभाव्य सुरुंग हटवण्यासाठी अमेरिकेने आता एक मोठी हायटेक लष्करी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत प्रगत युद्धनौका, रोबोटिक ड्रोन आणि लेझर तंत्रज्ञानाने सज्ज हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आले असून, लवकरच हा मार्ग आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सुरक्षित केला जाणार आहे.
काय आहे अमेरिकेचा 'मास्टर प्लॅन'?
अमेरिकन सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेचे मुख्य लक्ष्य इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स'ने समुद्रतळाशी पेरलेले सुरुंग शोधून ते नष्ट करणे हे आहे. यासाठी अमेरिका थेट मानवी जीव धोक्यात न घालता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे.
पाण्याखालचे रोबोटिक ड्रोन : टॉरपीडोच्या आकाराचे हे 'अनमँन्ड अंडरवॉटर व्हेईकल्स' समुद्रतळाचा नकाशा तयार करून सोनार तंत्रज्ञानाद्वारे लपलेले सुरुंग शोधून काढत आहेत.
लेझर हेलिकॉप्टर्स : एमएच-६०एस ही विशेष हेलिकॉप्टर्स लेझर सिस्टमच्या मदतीने समुद्राच्या पृष्ठभागाखालील सुरुंग ओळखत आहेत.
रिमोट कंट्रोल विस्फोट: एकदा सुरुंग सापडला की, एक छोटा रोबोट त्याजवळ जाऊन स्फोटाच्या साहाय्याने तो सुरुंग सुरक्षितपणे नष्ट करत आहे.
सुरक्षेचे 'एजिस' कवच
या मोहिमेत सहभागी असलेल्या अमेरिकन मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक युद्धनौकांवर 'एजिस कॉम्बॅट सिस्टम' बसवण्यात आली आहे. हे कवच केवळ सुरुंग हटवण्यात मदत करत नाही, तर इराणकडून होणाऱ्या संभाव्य हवाई किंवा क्षेपणास्त्र हल्ल्यांपासूनही ताफ्याचे रक्षण करत आहे.
८०० जहाजे अडकली, तेलाच्या किमती भडकल्या!
होर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील २० टक्के तेल आणि गॅस पुरवठ्याचा मुख्य मार्ग आहे. सध्या या संघर्षात सुमारे ८०० मालवाहू जहाजे आणि तेल टँकर्स तिथे अडकले आहेत. यामुळे कच्च्या तेलाच्या किमती १०० डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेल्या आहेत. अमेरिकन ॲडमिरल ब्रॅड कूपर यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, "आम्ही एक सुरक्षित समुद्री मार्ग तयार करत आहोत आणि लवकरच तो व्यापारासाठी खुला केला जाईल."
इराणवर वाढला दबाव
पाकिस्तानमधील शांतता चर्चा फिस्कटल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने सुरू केलेली ही लष्करी कारवाई इराणवर मोठा दबाव निर्माण करणारी ठरू शकते. जागतिक अर्थव्यवस्थेला बसणारा फटका कमी करण्यासाठी अमेरिकेने उचललेले हे पाऊल येणाऱ्या दिवसांत युद्धाची दिशा ठरवेल.
Web Summary : Amid Iran-Israel tensions, the US initiates a high-tech operation in the Strait of Hormuz to clear mines. Advanced warships, robotic drones, and laser helicopters are deployed to secure the vital trade route, aiming to ease global economic pressure. 800 ships are stranded, oil prices surged.
Web Summary : ईरान-इजरायल तनाव के बीच, अमेरिका ने होर्मुज जलडमरूमध्य में बारूदी सुरंगें हटाने के लिए एक हाई-टेक अभियान शुरू किया। महत्वपूर्ण व्यापार मार्ग को सुरक्षित करने के लिए उन्नत युद्धपोत, रोबोटिक ड्रोन और लेजर हेलीकॉप्टर तैनात किए गए हैं, जिसका उद्देश्य वैश्विक आर्थिक दबाव को कम करना है। 800 जहाज फंसे, तेल की कीमतें बढ़ीं।